Ticker

6/recent/ticker-posts

निकृष्ट दर्जाच्या पुलामुळे ट्रक फसला; जनतेत तीव्र रोष : प्रशासन जागे होणार की आणखी एखादा अपघात होईपर्यंत थांबणार?


मंगरूळपीर – शहरातील बस स्टँडजवळील हुडको कॉलनी परिसरात मुरूम घेऊन जाणारा एक ट्रक निकृष्ट दर्जाच्या पुलामुळे नाल्यात अडकला. सदर पुलाचे बांधकाम महामार्गाच्या कामाच्या अनुषंगाने करण्यात आले असून, त्याचे काम अत्यंत निष्काळजीपणे व निकृष्ट पद्धतीने केले गेले आहे. पुलाचे रचना म्हणावी की रपटा, पण त्या ठिकाणी दोन बाजूंनी मोठे डिपे असल्यामुळे नेहमीच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

या परिसरातील नागरिकांनी मंगरूळपीर नगरपरिषद, जिल्हाधिकारी वाशिम व नगर विकास आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याआधी अनेक वेळा पत्रव्यवहार होऊनही संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले आणि त्याचा प्रत्यय आज ट्रकच्या अडकण्याने पुन्हा एकदा आला.

अपघातानंतर काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यापुढे अशी घटना घडली आणि जीवितहानी झाली, तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.


प्रशासन नेहमीप्रमाणे "घटना घडल्यावरच" जागे होणार का? की नागरिकांच्या वेळेपूर्वीच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने या धोकादायक पुलाचे दुरुस्ती व नव्याने बांधकाम करणार?

"अपघात झाल्यावर डीपी हटवली जाणार का?"
"पूल कोसळल्यावर उपाय करणार का?"
"कुणाच्या जीवावर ही झोपमोड?"

या प्रश्नांनी परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी प्रशासनास इशारा दिला आहे की, भविष्यातील संभाव्य जीवितहानीसाठी संबंधित यंत्रणा जबाबदार असतील.

जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?
आता तरी प्रशासनाला जाग येणार का?

अपघाताची वाट पाहताय? मंगरूळपीर नगरपरिषद विभाग झोपेत की निष्क्रिय?

मंगरूळपीर नगरपरिषद विभाग जणू एखाद्या भीषण अपघाताच्या प्रतीक्षेत आहे का, असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. धोकादायक ठरलेल्या पुलाच्या दुरवस्थेवर किंवा त्याजवळील डीपी  हटवण्याच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही.

सदर परिसरात दररोज शेकडो नागरिकांचा वावर असून, लहान मुले, वृद्ध आणि महिला यांच्यासाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा लोकांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत आहे.

प्रशासनाने तातडीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पूल दुरुस्ती व डीपी हटवण्याचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी आता जनतेकडून करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments