मंगरूळपीर (प्रतिनिधी) – मंगरूळपीर शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्भागातील परिसरांपर्यंत साफसफाईचे हाल नागरिक रोज अनुभवत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते सम्राट वाईन बार, हुडको कॉलनी, तसेच खरेदी-विक्रीपासून आठवडी बाजार परिसरापर्यंत कोणत्याही प्रकारची नियमित स्वच्छता होताना दिसत नाही. नागरिक स्वच्छता कर वेळेवर भरत असताना, या रस्त्यांवर प्रशासनाची नजर का नाही? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी उपस्थित केला आहे.
इरफान शेख म्हणाले, "स्वच्छता कर वसुली मात्र वेळेवर केली जाते. पण शहरातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत बेजबाबदार आहे. केवळ तहसील कार्यालयाचा चौक स्वच्छ ठेवून प्रशासन 'स्वच्छ भारत अभियान' दाखवतोय, पण प्रत्यक्षात शहरातील नागरी सुविधा कोलमडलेल्या आहेत."
पिण्याच्या पाण्याची वणवण
शहरातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा. अनेक भागात आठवड्याभरापर्यंत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. डीपीवरचा ड्यू गेल्यास, आठ दिवस कोणतीही दुरुस्ती होत नाही. ही अवस्था म्हणजे नागरी सुविधांचा सपशेल अपमान असल्याचे नागरिकांनी सांगितले.
केवळ फोटोसाठी स्वच्छता?
"जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छतेचे बॅनर लावून फोटो काढण्यापुरतीच मोहीम मर्यादित आहे का?" असा सवाल करत इरफान शेख यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. "कागदावर चालणारे स्वच्छ भारत अभियान आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहतो आहे," असे ते म्हणाले.
नागरिकांच्या पैशाचा अपमान थांबवा!
प्रशासन फक्त कर वसुलीतच तत्पर असून, नागरिकांच्या मूलभूत गरजा – पाणी, स्वच्छता, आरोग्य – पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. इरफान शेख यांनी मागणी केली की, "स्वच्छता कर घेत असाल तर प्रत्यक्ष स्वच्छता देखील दाखवा, अन्यथा हा कर बंद करा."
0 Comments