मंगरूळपीर शहरात लाईटबंदीमुळे संतप्त जनतेचा उद्रेक; नगरसेवक अनिल गावंडेंचा गांधीगिरी आंदोलनाचा इशारा!
मंगरूळपीर (ता. ९ एप्रिल) – येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील आंबेडकर चौक ते शेलगाव फाटा (वाशिम रोड) या मुख्य महामार्गावर गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून रस्त्यावरील लाईट्स बंद असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अनिल विठ्ठलराव गावंडे (भाजपा) यांनी नगरपरिषद प्रशासनावर थेट आरोप करत एक निवेदन सादर केले असून, "दोन दिवसात लाईट सुरू न झाल्यास मशाली पेटवून नगरपरिषद कार्यालयासमोर गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल," असा इशारा दिला आहे.
नगरसेवक गावंडे यांनी सांगितले की, "शहराच्या सौंदर्यासाठी आणि सुरक्षेसाठी नगरपरिषद निधीतून लाखो रुपये खर्च करून पोलवर रोषणाई लावण्यात आली आहे. मात्र कामाचा दर्जा अत्यंत खराब असून अनेक ठिकाणी लाईट्स बंद आहेत. कामाचे टेंडर चार ठेकेदारांना देण्यात आले असून, या लाईट्सवर एक वर्षाची हमी असतानाही प्रशासन आणि ठेकेदार दोघेही झोपेत आहेत."
विशेष म्हणजे, आंबेडकर जयंतीच्या दिवशी याच मार्गावर भव्य मिरवणूक निघणार आहे. रस्त्यावर अंधार असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी वाशिम, उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर, तसेच पोलीस स्टेशन मंगरूळपीर यांना पाठविण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
गांधीगिरी आंदोलन पेटवणार!
नगरसेवक गावंडे यांनी पुढे स्पष्ट केले की, "प्रशासनाने तात्काळ योग्य पावले उचलली नाहीत, तर गांधीगिरी मार्गाने मशाल आंदोलन उभारले जाईल. आम्ही शांततापूर्ण मार्गाने निषेध करू, पण अन्याय सहन करणार नाही."
0 Comments