Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय वसतिगृहात सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा – विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची पेरणी


मंगरूळपीर (ता. मंगरूळपीर) – तुळजापूर येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत सामाजिक समता सप्ताह प्रेरणादायी आणि भव्य उत्साहात संपन्न झाला. सप्ताहभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, जे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व नैतिक विकासासाठी मोलाचे ठरले.

सप्ताहाची सुरुवात ८ एप्रिल रोजी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाली. ९ एप्रिल रोजी निबंध स्पर्धा, तर १० एप्रिल रोजी स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यात आली.

११ एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करताना त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकणारा विशेष कार्यक्रम झाला. १२ एप्रिल रोजी रंगरंगोटी आणि चित्रकला स्पर्धा, तर १३ एप्रिल रोजी वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली.

सप्ताहाचा परमोच्च बिंदू १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे गृहपाल श्री. प्रवीण गीरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

गृहपाल श्री. गीरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांचे पालन, समतेची शिकवण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव यांचे महत्त्व पटवून दिले.

संपूर्ण सप्ताहभर विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वत:तील कला, विचार आणि नेतृत्वगुणांची उजळणी केली. सामाजिक समता सप्ताह विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय आणि मूल्याधारित अनुभव ठरल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आले.


Post a Comment

0 Comments