– किशोर देशमुख | वास्तवओ जिल्ह्याचे
वाशिम :
राज्यभरात सध्या गाजत असलेला मुद्दा म्हणजे कृत्रिम जलसंकट – पाणीटंचाई! केंद्र शासनाच्या ‘हर घर जल – घर घर नल’ या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्ह्यात गंभीर तफावत आढळून आली असून, या योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये अधिकाऱ्यांचे, ठेकेदारांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे साटेलोटे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ‘हर घर जल’ ही योजना सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून संपूर्ण देशात ही योजना राबवली जात आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यात ही योजना केवळ कागदोपत्रीच अंमलात आलेली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून योजनेसाठी प्रस्ताव, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर आणि निधी वाटप या साऱ्या टप्प्यांत काम झाले असले, तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई कायम आहे. काही गावांत ५०-७० टक्के कामे झाली असली, तरी नागरिकांना अजूनही नळाने पाणी मिळत नाही. ही गंभीर बाब असून, पंतप्रधानांच्या आदेशाला थेट धाब्यावर बसविण्याचे धाडस या जिल्ह्यात केले जात असल्याचे दिसते.
कामे निकृष्ट दर्जाची, तपासणी न झालेली आणि चुकीच्या समित्यांकडे हस्तांतरित करून या योजनेंतर्गत निधीचा अपव्यय केल्याचे उघड होत आहे. काही गावांत योजनांची फक्त औपचारिकता उरली असून, पाण्याचे मृगजळच जनतेला दिसत आहे.
योजनेचा उद्देश जिथे पाणीपुरवठा होता, तिथे आज कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून दुसऱ्या योजनेचा आधार घ्यावा लागतो आहे. शासनाचा पैसा खर्च झाला, तरी नागरिकांना पाणी मिळत नाही; परिणामी, शासनालाच नव्याने खर्च करण्याची वेळ येते आहे.
या सर्व प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी, अधीक्षक व मुख्य अभियंता यांनी त्वरित लक्ष घालून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, ही योजना देखील भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतून बसेल, आणि जनतेचा विश्वासच उध्वस्त होईल
0 Comments