प्रकल्पाची पाहणी करून दिले मार्गदर्शन, आयुर्वेद पंचगव्य चिकित्सा केंद्र सुरू करण्याचा मानस
भुसावळ – भुसावळजवळील कुर्हा पानाचे येथे ललवानी फाउंडेशनच्या वतीने संचालित स्व. स्वप्निल स्मृती गोकुळ ग्राम एवं अनुसंधान केंद्र या गोशाळेला गोशाला महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. बन्सीलाल जैन (दुगड) यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करत गायींच्या संगोपनाची आस्थेवाईक चौकशी केली व काही वेळ गोशाळेच्या परिसरात घालवला.
या भेटीनंतर जिल्हाध्यक्षांनी गोशाळेच्या सुसज्जतेबाबत समाधान व्यक्त करत परिसरातील नैसर्गिक हिरवळ, पंचवटी, बागा व विविध सुविधा यांचे कौतुक केले. त्यांनी गोशाळेच्या अतिथी गृह, बांबू हाऊस, सर्व्हंट क्वार्टर, साधू-साध्वी विहारधाम आणि मुलांसाठी असलेल्या खेळाच्या जागेलाही भेट दिली.
डॉ. जैन यांनी आयुर्वेद पंचगव्य चिकित्सा केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त करत, गोमूत्र व शेणापासून विविध उत्पादने निर्मितीच्या संधींबाबत मार्गदर्शन दिले. संस्थेने अधिक स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचीही माहिती दिली.
यावेळी सोपानभाऊ डामरे, महेश जगताप, अप्पा जगताप, सखाराम बारेला, संदीप पाटील, सौ. गायत्री जगताप आदी गोसेवकांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी.एम. ललवानी यांनी, निवृत्तीनंतर आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृतीसाठी गोसेवेचा व्रत हाती घेतल्याबद्दल डॉ. जैन यांनी त्यांचे विशेष कौतुक करून भविष्यातील सहकार्याचे आश्वासन दिले.
प्रा. ललवानी यांनीही जिल्हाध्यक्षांच्या भेटीबद्दल आभार मानून त्यांच्या सूचनांचे मन:पूर्वक स्वागत केले.
0 Comments