Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: मानवतेच्या नवयुगाचा साक्षात प्रकट दिन!


सुधाकर चौधरी, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक 

१४ एप्रिल –
आजचा दिवस म्हणजे केवळ एका महामानवाचा जन्मदिवस नव्हे, तर एका क्रांतीचा, एका विचारधारेचा, एका उज्ज्वल भविष्याचा आरंभदिवस!
ज्यांनी मनुष्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, समाजव्यवस्थेच्या जळत्या ढिगाऱ्यावरून माणुसकीची नवी गाथा लिहिली – त्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र जयंतीनिमित्त संपूर्ण देशवासीयांना आणि धम्म बांधवांना वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक श्री. सुधाकर चौधरी यांच्यातर्फे हजारो कोटी हार्दिक शुभेच्छा!

बाबासाहेब हे केवळ नाव नाही, ती एक चळवळ आहे, प्रेरणा आहे, आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा प्रकाशस्तंभ आहे. त्यांच्या विचारांनी अज्ञान, अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभावाच्या काळोखावर प्रखर प्रहार केला. त्यांनी समाजाला संविधानाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि न्यायाचे दैदीप्यमान शस्त्र दिले.

सुधाकर चौधरी म्हणतात, “बाबासाहेबांनी महिलांना सन्मान, शेतकऱ्यांना हक्क, कामगारांना आत्मसन्मान आणि वंचितांना अस्तित्व दिले. ते हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध उठलेला विद्रोह होते, आणि आजही त्यांच्या विचारांनी प्रत्येक पिढीला न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते.”

देशभरात आज विविध कार्यक्रम, मिरवणुका, भजन, धम्म प्रवचन, ग्रंथदिंडी यांचं आयोजन होऊन बाबासाहेबांना मानवंदना अर्पण केली जाते आहे. तरुणाई बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या त्रिसूत्रीचा अंगीकार करत नवभारताच्या निर्मितीसाठी सज्ज झाली आहे.

या जयंतीचा खरा अर्थ – बाबासाहेबांचे विचार केवळ स्मरणात नव्हे तर आचरणात यावे, हीच खरी अभिवादनाची भावना असावी, असा संदेश संपादक सुधाकर चौधरी यांनी वाशिम खबर आज महाराष्ट्राच्या व्यासपीठाच्या माध्यमातून केला आहे.

Post a Comment

0 Comments