Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लोणावळा शहरामध्ये स्वच्छता अभियान; 3166 किलो कचरा संकलन


प्रतिनिधी श्रावणी कामत 

 लोणावळा  : महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरांमध्ये आज रविवारी 2 मार्च रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सात विभागामध्ये राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात तब्बल 3166 किलो कचरा संकलित करण्यात आला आहे यामध्ये 3046 किलो सुका व 120 किलो ओला कचरा संकलित झाला आहे. महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त या स्वच्छता अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले होते. लोणावळा शहरांसोबतच तळेगाव शहर व देहूरोड या ठिकाणी देखील हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 
      लोणावळा शहरामध्ये राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामध्ये लोणावळा शहरातील डोंगरगाव वाडी, तुंगार्ली यासह देवले, वेहेरगाव, कामशेत, नाणे, पवनानगर, आंबवणे या आठ श्री बैठकांमधील 337 श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी साडेआठ वाजता लोणावळा नगर परिषदेच्या पुरंदरे मैदानावर सर्व श्री सदस्य एकत्र झाले. त्या ठिकाणी सर्व सदस्यांना त्यांच्या श्री बैठकीप्रमाणे कामाचे व साहित्यांचे वितरण करण्यात आले. साडेनऊ ते साडेदहा या एक तासांमध्ये हे अभियान राबवण्यात आले. नौसेना बाग ते हनुमान टेकडी, नीलकमल ते कैलास नगर, लाकडाची वखार रस्ता, लोणावळा शहर पोलीस स्टेशन परिसरातील रस्ता, खोंडगेवाडी ते वर्धमान सोसायटी, कुमार रिसॉर्ट ते कैलास पर्वत दरम्यानचा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा, कुमार रिसॉर्ट ते भंगारवाडी मुख्य बाजारपेठेतील रस्ता या परिसरात साधारणता 14 किलोमीटर अंतराचे रस्ते झाडून त्यावरील कचरा व आजूबाजूचा कचरा या स्वच्छता अभियानात गोळा करण्यात आला आहे. संकलित केलेला सर्व कचरा हा लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोवर पाठवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments