Ticker

6/recent/ticker-posts

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या "ज्ञानज्योती सावित्री बाई फुले" यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन, सविताताई गोरे


कर्मयोगी बापूरावजी चौधरी बहुउद्देशीय एनजीओ च्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 
सामाजिक कार्यकर्त्या .सविताताई गोरे, उज्वलाताई चौधरी, मिटकरी ताई,
विजयाताई शेळके, वर्षाताई आंबेकर, स्वातीताई बेंद्रे, वृषालीताई शेंद्रे, सुजाता ताई बोरकर, अर्चनाताई चौधरी इत्यादी महिलांची उपस्थिती होती 
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्त्या .सविताताई गोरे, यांनी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नेवसे पाटलांच्या कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्या जिज्ञासू होत्या. 1840 साली त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याबरोबर झाला. जोतीराव फुले यांनी तत्कालीन अनिष्ट प्रथा नाकारून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. फुलेंनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटूंबापासून केली. या कार्याला जोतीरावांच्या वडिलांचा विरोध होता. जोतीराव फुले यांनी घर सोडले पण शिक्षण देण्याचे कार्य सोडले नाही. क्रांतीज्योती महात्मा फुलेंनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली. ही देशातील पहिली सार्वजनिक आणि मोफत शाळा आहे. त्या शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी अध्यापनाचे काम केले. ज्ञानाचे महत्त्व सांगताना सावित्रीबाई फुले लिहितात
               
  "ज्ञान नाही, विद्या नाही।
   ती घेणेची गोडी नाही।
   बुद्धी असून चालत नाही।
  तयास मानव म्हणावे का?।"
                                   
मानव हा बुद्धी ग्रहण करू शकतो, त्यामुळे त्याने ज्ञानार्जन केले पाहिजे, मानव जर ज्ञानार्जन करत नसेल तर त्याला मानव तरी का म्हणायचे? असा प्रश्न सावित्रीबाई फुले नी विचारला होता.

   सावित्रीबाई फुले यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला. मराठीचा अभिमान बाळगला, परंतु इंग्रजी भाषेचा त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही, याउलट इंग्रजी भाषेचे महत्व सांगणारी कविता त्यांनी लिहिली. त्या लिहितात
   "इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी ।
    शूद्रांना उद्धारी । मनोभावे ।"
  
इंग्रजी भाषेत शिक्षण घेतले तर तुमच्या पिढ्यानपिढ्याचे कल्याण होईल, असे सावित्रीबाई फुले यांचे मत होते.ते मत आज खरे ठरले आहेत.इंग्रजी भाषा शिकल्यामुळे अनेक महिला डॉक्टर, बॅरिस्टर, इंजिनिअर, वकील अशा अनेक उच्च पदावर त्यांनी आपले स्थान मिळवले  आहेत.

   महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईना शिकविले. त्या देशातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला. 

    सावित्रीबाई फुले यांनी केशवपन पद्धतीला विरोध केला. या अमानुष प्रथेबद्दल सावित्रीबाई फुले यांनी विधवा बालिकांचा आक्रोश कवितेतून पुढीलप्रमाणे व्यक्त केले आहे.

 "काहो आण्णा, मी तुमची लाडकी ।
       का करिता मला बोडकी ।।" 

 सावित्रीबाई फुले या अत्यंत संवेदनशील, कारुण्यमय मनाच्या होत्या. त्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध लढल्या सावित्रीबाई फुले या प्रागतिक विचारांच्या होत्या. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी,  सायास इत्यादी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला.  सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना करून निराधार महिलांना आधार दिला. त्या घाबरल्या नाहीत. धर्मांध लोकांना त्यांनी निर्भीडपणे प्रतिकार केला.

  सावित्रीबाई फुले आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. माहेरी गेल्यानंतर जोतिरावांना पाठवलेल्या पत्रात त्या म्हणतात "कांही वैरी विदूषक आपल्याला ठार मारण्यास टपलेले आहेत,पण त्यांच्या भीतीने आपण हे शैक्षणिक, समाज परिवर्तनाचे काम अर्ध्यावर सोडायचे नाही". सावित्रीबाई फुले यांच्या या भूमिकेतून त्यांचा निर्भीडपणा, हिम्मत आणि लढाऊ बाणा प्रकर्षाने दिसतो. त्यांनी महात्मा फुले यांना संकटसमयी प्रोत्साहन दिले, त्यांना नाउमेद केले नाही. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही.
 ग्रामस्थाना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माहेरी जाऊन त्या सुखात राहिल्या नाहीत, तर तेथे देखील त्यांनी प्रबोधन कार्य चालूच ठेवले. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.पती निधनानंतर सती न जाता त्यांनी निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले. दत्तक पुत्र यशवंताला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले.

  सकाळी उठल्याबरोबर आपण जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करावे. त्यांचे दर्शन घेऊनच आपल्या दिवसाला सुरुवात करावी, असे सावित्रीबाई फुले एका काव्यातून सांगतात 
     
"छत्रपती शिवाजीचे । प्रातःस्मरण करावे।
शूद्रादि अतिशूद्रांचा । प्रभू वंदू मनोभावे।"

   सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्या संकटात डगमगल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. सावित्रीबाई फुले लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आपल्याला हे सांगते की मुलगीसुद्धा वंशाला दिवा असते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा एक अस्सल फोटो उपलब्ध आहे. हा फोटो जाणीवपूर्वक काढलेला नसून सहज काढलेला आहे.यामध्ये सावित्रीबाई जोतीरावांच्या उजव्या बाजूला उभ्या आहेत. म्हणजे स्त्री ही दुय्यम दर्जाची नसून ती देखील हिम्मतवान,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते, हे जोतीराव फुलेंच्या नेणिवेतदेखील होते. सावित्रीबाई यांनी ते  स्वकर्तृत्वाने दाखवून दिले, त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या केवळ पारंपारिक शिक्षिका नव्हत्या, तर त्या गुलामगिरी, अनिष्ट प्रथा,  यांच्याविरोधात लढणाऱ्या  लेखिका, कवयित्री आणि प्रबोधनकार होत्या. त्यांचा आज स्मृतिदिन  आहे. स्मृतिदनानिमित्त  त्यांना विनम्र अभिवादन! प्रत्येक " स्त्रीला "  अभिमान वाटावा,
ज्या माऊलीच्या अथक परिश्रमातून आधुनिक भारतात स्त्री-वादी ज्ञानज्योत प्रगटली, स्त्री ला समाजामध्ये सन्मानाने  शिक्षणाचा हक्क मिळाला,
 ज्यांच्या विचारांमुळे संपूर्ण भारत देश सन्मानाची वाटचाल प्रगती प्रथावर नेतोय,
 स्त्री -परिवर्तन वादामुळे देशाची प्रतिमा
 खऱ्या अर्थाने जागतिक पटलावरती 
 उंचावली..
ह्यातून आज लोकशाही पर्यंत स्त्री हक्काची वाटचाल पोहोचली 
अश्या 
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या  "ज्ञानज्योती सावित्री बाई फुले" यांच्या जयंती निमित्त   विनम्र अभिवादन
 

Post a Comment

0 Comments