Ticker

6/recent/ticker-posts

तब्बल ३८ वर्षांनी गळाभेट होणार जिवाभावाच्या मित्रांचीमालेगाव येथील ना.ना. मुुंदडा विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा

मालेगाव - जीवनातील काही वर्ष ज्यांच्यासोबत खेळलो, भांडलो, शिकलो आणि जीवनगाणे जगलो, याच काही वर्षात मने जुळली, भावबंध जुळले आणि भावना शेअर करता करता कधी ते जिवाभावाचे मित्र झाले हे कळलेच नाही. ह्या भावबंधाची पिडा ताटातुट झाल्यानंतरच लक्षात आली. मैत्रीचे नाते हे सर्व नात्यांच्या वरचे आणि ईश्वरीय वरदान आहे हे समजले तेव्हा डोळ्यांसोबत मनातही भावनाचे ढग दाटुन आले. ह्याच बालपणाच्या निरागस  भावबंधांच्या मैत्रजिवांना एकत्र आणून जुन्या आठवणीचे इंद्रधनुष्य पुन्हा मनाच्या आकाशात फुलविण्यासाठी येथील ना. ना. मुंदडा विद्यालयात तब्बल ३८ वर्षांनी म्हणजेच १९८६ नंतर ‘परत एकदा भेटु ना ’ असे म्हणत वर्ग दहावीच्या बॅचचे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या रुपाने एकत्र येत आहेत.
  ‘मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली, तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली’ या कवीच्या ओळीप्रमाणे बालपणीच्या त्या काळात घरुन शाळेत जाण्यासोबतच शाळेतील मित्रांना कधी भेटतो याची हुरहुर लागलेली असायची. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसुन जेवणाचा डबा शेअर करणे, मित्रांसोबत भांडणे, अभ्यासाचे नोटस् मागणे, एकाच सायकलवर डबलसिट जाणे, एकदुसर्‍यांचा वाढदिवस साजरा करणे, ह्या धिंगामस्तीमध्ये वर्ष कधी सरते ते कळतच नाही. मैत्रीचे नाते श्रीमंत गरीब असा भेदाभेद पाहता नाही. तसेच मैत्री ही जात सुध्दा पाहत नाही. केवळ मनाला भावना कळाल्या की मैत्रीचा वृक्ष हा अधिक दाट आणि डौलदार होत जातो. आणि या मैत्रीच्या वृक्षाच्या सावलीत शाळेतील दिवस कसे भुर्रकन उडून जातात हे कळतच नाही. दहावी झाल्यानंतर प्रत्येकाचे पाय त्याचे नशिब घडविण्यासाठी ओढत घेवून जातात. जीवनाच्या एका वळणावर आपापले भविष्य घडवतांना सुध्दा वर्गातील जिवलग मित्रांच्या आठवणी मनात पिंगा घालु लागतात. आज या मित्रांपैकी कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी वकील तर कुणी देश सोडून विदेशात सुध्दा गेला असेल. तर कुणी अजुनही वर्तमानात राहून भविष्य घडविण्यासाठी जिवापाड मेहनत करत असेल. मात्र ‘का कुणास ठाऊक जीवनात काहीतरी राहुन गेल्यागत वाटते, तु सध्या काय करतोयस हे पहावसं वाटतयं’ या कवींच्या ओळीप्रमाणे अशा या सग्यासोसर्‍यांपेक्षाही जास्त असलेल्या व खरी मैत्री जगणार्‍या या मित्रांना भेटण्याची हुरहुर ना.ना. मुंदडा विद्यालयात १९८६ साली वर्ग १० वी मध्ये शिकणार्‍या या विद्यार्थी विद्यार्थीनींना लागली आहे. तब्बल ३८ वर्षानंतर १९ जानेवारी २०२५ ला या विद्यार्थी विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगाव येथे ठेवण्यात आला असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रदीप शर्मा, मोहन मुंजाळ, जीवन भांडेकर, हरीष लाहोटी, अनिल नागापूरे, श्रीपाद प्रल्हाद पिदडी, गिरीश अग्रवाल, लक्ष्मीकांत काटे, अजय लाहोटी, अनिल जाधव, शिवाजी घुगे, कु भारती म. सोळंके, वर्षा चिरडे (बोडखे), आनंदा देवळे, अनिता मु.काटेकर, मंजीत गोरेगांवकर, गजानन शेवाळे, सुनील भूतड़ा, कल्पना बिरला (चांडक), अरुण भूतड़ा, चंचल लाहोटी (बियाणी), निर्मला काटेकर (सुडके),  जयश्री टवलारकर (खानझोडे), राजेश पुरोहित, विनोद नागोलकर, दिलीप सं. मोरे, राम दशरथ लोहकरे, प्रशांत लोखंडे, कल्पना कायंदे, प्रगती दळवी (पांडे), सतीश मानधने, महेश अग्रवाल, संतोष जोशी आदींनी दिली आहे. तसेच सत्र १९८६-८७ मध्ये वर्ग १० वी च्या सर्व ४ तुकड्या मध्ये एकुण २१७ विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत होते. त्यापैकी देश-विदेश तथा ग्रामिण भागातील १८६ विद्यार्थ्यांसोबत संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही आयोजन समितीने दिली आहे.

Post a Comment

0 Comments