सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन म.राज्य, बुलढाणा कार्यालयातील औषध निरीक्षक, श्री. गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली होती. त्या आधारे श्री. एम.व्ही. गोतमारे, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन म. राज्य वाशिम यांच्या समवेत दिनांक 19/12/2024 रोजी मौजे लोणार येथे चंदन मेडीकलचे मागे रुम क्रमांक 1, बस स्टँड जवळ, लोणार येथे तपास चौकशी केली असता सदर जागेत विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आल्याने श्री. सुशिल पुनमचंद दरोगा हजर व्यक्ती यांच्याकडून नमूना 16 व पंचनामा अंतर्गत एकूण 24.33 लक्ष चा साठा जप्त करण्यात आला आहे. सदर साठ्यातून औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
तसेच चंदन मेडीकल स्टोअर्स, लोणार येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधी (Vigrox-100) आढळून आल्याने रुपये 8225/- चा साठा नमूना 15 दिनांक 19/12/2024 रोजी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. जिल्हयातील सर्व मेडीकलधारकांना कळविण्यात येते की, झोपेच्या गोळया, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व अलोपॅथीक औषधे त्यांनी कोणत्याही परीस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकांना देवू नयेत, तसेच प्रत्येक औषधाचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे अशा प्रकारचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच बुलढाणा जिल्हयातील सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कुठलीही अॅलोपॅथीक औषधे विना प्रिस्कीपशन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. स्वतःच्या मनाने औषधे घेतल्याने शरीरावर दुष्परीणाम होतात असे सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, बुलढाणाचे श्री. गजानन प्रल्हाद घिरके यांनी सूचीत केले आहे.
0 Comments