विभागीय वनअधिकार्यांची लेखी माहिती : मनसे महिला सेनेचे आमरण उपोषण मागे
वाशीम - मालेगाव तालुयातील अनसिंग येथील रोपवनात ५ फेब्रुवारी २०२३ ला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीस जबाबदार असलेल्या सहाय्यक वनसंरक्षकाविरुध्द जबर शिक्षेचा प्रस्ताव तयार करण्यासह मग्रारोहयो योजनेसंबंधीत विविध मागण्यांसंदर्भात विभागीय वनअधिकारी सामाजीक वनीकरण यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सिता धंदरे आणि मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी सोमवार, २१ ऑगष्ट रोजी सामाजीक वनीकरण कार्यालयासमोर सुरु केलेले आमरण उपोषण गुरुवार, २४ ऑगष्ट रोजी मागे घेतले.
सामाजीक वनीकरण अंतर्गत मालेगाव तालुयातील मंजूर कामाच्या यादीच्या माहितीसह इतर माहिती मिळण्यासाठी रितसर निवेदन व माहिती अधिकार दिल्यानंतरही या विभागाकडून अर्जदाराला कोणतीही माहिती देण्यात
आली नव्हती. तसेच मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी हे त्यांच्या कार्यालयात नेहमीच गैरहजर राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. याशिवाय मौजे अनसिंग येथील गायरान जमिनीवर वनविभागाच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली होती, मात्र या जमिनीला लागलेल्या आगीत अनेक वृक्ष जळून गेले. याबाबतचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी तात्पुरते वृक्ष लावून याचा थातुरमातुर अहवाल पाठविण्यात आला. मात्र या वृक्ष लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे याची माहिती मिळण्यासाठी आरटीआय कायद्यानुसार अर्ज दिल्यानंतर अर्जदाराला माहिती देण्याऐवजी मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकार्याकडून अर्जदाराला अपमानजनक वागणूक देण्यात आला असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला होता. याबाबत सामाजीक वनीकरण विभाग वाशिम आणि अमरावती यांना निवेदन दिले असता त्या कार्यालयाकडूनही थातुरमातुर चौकशीची पत्रे पाठविण्यात आली मात्र निवेदनात नमूद मुद्यावर कोणतीही कारवाई किंवा माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे दिलेल्या मुद्यावर चौकशी व माहिती देण्यास दिरंगाई करणार्या अधिकार्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महीला सेनेच्या वतीने २१ ऑगष्टपासुन सामाजीक वनीकरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.
उपोषणाच्या चवथ्या दिवशी २४ ऑगष्ट रोजी विभागीय वनअधिकार्यांनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये अनसिंग येथील रोपवनात लागलेल्या आगीतील नुकसानीस जबाबदार सहाय्यक वनसंरक्षक मालेगाव यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ नियम ८ नुसार जबर शिक्षेकरीता प्रस्ताव तयार करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय गट लागवड, रस्ता दुतर्फा लागवड व रोपवाटीकाबाबत कामाची यादी व अंदाजपत्रके उपलब्ध करुन देण्यात येतील शिवाय वनपरिक्षेत्र अधिकार्याच्या कार्यालयातील गैरहजेरी बाबत दस्ताऐवज तपासून माहिती दिली जाईल असे लेखी पत्रात नमुद करण्यात आले आहे. दिलेल्या लेखी पत्रामुळे मनसे महिला जिल्हाध्यक्ष सिता धंदरे व वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी मनसे जिल्हाध्यक्ष राजु पाटील किडसे यांच्या उपस्थितीत आपले लेखी उपोषण मागे घेतले. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन कढणे, शहराध्यक्ष रवि वानखेडे, वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे, कामगार सेना सदस्य ओेंकार फड, महाराष्ट्र सैनिक देविदास जैताडे, बबलु गायकवाड,प्रमिलाबाई इंगळे, विमलबाई गोदमले, बेबीताई धुळधुळे, सय्यद अस्लम आदी उपस्थित होते.
0 Comments