Ticker

6/recent/ticker-posts

उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान



 मुंबई, दि २० :- रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत.रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील,ऑटोमोबाईल्स,आयटी, विमानबांधणी,आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले.ते उद्योग,नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे,असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. 
उद्योग विभागाच्यावतीने देण्यात येणारे उद्योगरत्न', 'उद्योग मित्र', 'उद्योगिनी' आणि 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉल येथे प्रदान करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन श्री बैस बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक,उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावतीने टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला.तर उद्योगमित्र पुरस्कार अदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना,उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.'उद्योगरत्न' पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये ,सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. 'उद्योगमित्र' पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, 'उद्योगिनी' पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी महत्त्वाचे 'उद्योग पुरस्कार' सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि राज्याच्या उद्योग विभागाचे अभिनंदन केले.कालच श्री रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार देण्यासाठी भारतीय उद्योगक्षेत्रात रतन टाटा यांच्यापेक्षा चांगला माणूस असूच शकत नाही असेही ते म्हणाले. 

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तरुण राष्ट्र म्हणून,भारताला आज अभूतपूर्व अशी संधी आहे. जगातील अनेक विकसित देश वृद्ध होत आहेत. ते त्यांच्या कामगारांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत.या संधींचा लाभ
घेण्यासाठी महाराष्ट्राने कौशल्य विकास आणि उद्योजकतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे.कौशल्य विकासात उद्योग भागीदारी आवश्यक आहे.भारत स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात पाऊल ठेवत असताना, महाराष्ट्राच्या पुढील २५ वर्षांच्या औद्योगिक विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी नेते, उद्योगपती आणि विविध चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रमुखांची उच्चाधिकार समिती स्थापन करावी. देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीचे स्वागत होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असे अद्योगिक वातावरण राज्यात निर्माण होईल अशी आशा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. 

 आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली सीरम इन्स्टिट्यूटने 'कोविशील्ड' ही लस विकसित करून देशाचा नावलौकिक केला आहे.पहिल्या 'उद्योग मित्र' पुरस्कारामुळे आदर पुनावाला यांच्यासोबतच 1960 च्या दशकात सीरम इन्स्टिट्यूटची पायाभरणी करणा-या सायरस पूनावाला यांचाही सन्मान पुरस्काराच्या रुपात होत आहे.आदर पुनावाला यांचे कौतुक करताना ते म्हणाले की,विविध देशांचे राज्यपाल, मंत्री,राजदूत अनेकदा भारताने विकसित केलेल्या 'कोविशील्ड' लसीचा उल्लेख करतात.कोविड-19 महामारीनंतर त्यांना 'कोविशील्ड' लस उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आपल्या देशवासीयांचे प्राण वाचवल्याबद्दल ते भारताचे मनापासून आभार मानतात.
 किर्लोस्कर हे उद्योगक्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापन केलेल्या आणि शंतनुराव किर्लोस्कर यांच्यासारख्या महान उद्योजकांनी चालवलेल्या १३५ वर्ष जुन्या किर्लोस्कर समूहालाही हा सन्मान जातो.गौरी किर्लोस्कर यांना देण्यात येणारा 'उद्योगिनी' पुरस्कार सर्व महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना दिला जाणारा मराठी उद्योजक पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे.शिंदे हे एक दूरदर्शी शेतकरी आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी शेतीची क्षमता ओळखली.
 
 उद्योग पुरस्कारांसाठी पुरस्कार विजेत्यांची निवड करताना, सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र या तीनही क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांची निवड करून चांगले काम केले आहे असेही राज्यपाल श्री.बैस म्हणाले. 


*रतन टाटा म्हणजे माणसातला देवमाणुस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

आपण कुणीही देव पाहिलेला नाही. पण, देव चराचरात आहे. गरजूंच्या मदतीला देव नेहमी धावतो. यंदाच्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी आपण अशाच एका माणसातल्या देवमाणसाची निवड केली आहे. टाटा म्हणजे अढळ विश्वास, गुणवत्तेची खात्री आणि प्रचंड सामाजिक भान असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

आपण विविध क्षेत्रात विशेष असं योगदान दिलेल्या मान्यवर व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत करत असतो. त्याच धर्तीवर उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी आपण उद्योग पुरस्कारांची सुरवात केली आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या औद्योगिक प्रगतीचं ग्रोथ इंजिन आहे. या ग्रोथ इंजिनाची सगळ्यात मोठी शक्ती अर्थातच उद्योग क्षेत्राची आहे. म्हणूनच हे उद्योग पुरस्कार देऊन राज्यातील उद्योग विश्वाचा सन्मान करण्याचे शासनाने ठरविले आहे.

उद्योगरत्न पुरस्कारासोबतच आज आपण 'उद्योग मित्र', 'उद्योगिनी' आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक हे तीन पुरस्कार प्रदान करत आहे. आजच्या चारही सत्कारमुर्तीमधील मोठं साम्य म्हणजे ट्रस्ट, विश्वास आहे. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आपल्या राज्याला उद्योगपतींच्या अनेक पिढ्यांनी घडविले. अगदी पारतंत्र्यापासून उद्योगांनी या देशासाठी योगदान दिले आहे. आज मोठ्या प्रमाणावर सेवाक्षेत्र, आयटी क्षेत्र राज्यात आणि देशात विकसित झालं आहे. या उद्योग क्षेत्राने आजवर अब्जावधी हातांना रोजगार दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्याला कृषी आधारित उद्योगांना देखील राज्यात वाढवायचे आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर्सचे योगदान द्यायचे आहे. दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत आम्ही १ लाख ३७ हजार कोटींचे करार केले. ते नुसते कागदोपत्री नाहीत तर ८५ टक्के करारांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आज परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आला आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


*सर्वोत्कृष्ट मानव संसाधन महाराष्ट्रात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 टाटा ट्रस्टने आधुनिक भारताच्या विकासात अमूल्य असे योगदान दिले आहे. जगात पाचव्या क्रमांकावर असलेले टाटा ग्रुप महाराष्ट्रात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य प्रत्यक्ष गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे.सर्वोत्कृष्ट मानवसंसाधन महाराष्ट्र राज्यात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, देशाचे स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र राज्यात आहे. सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहे. स्टील इंडस्ट्रीत गुंतवणूक वाढत आहे, भविष्यात 'स्टील सिटी' म्हणुन गडचिरोली नावारूपाला येत आहे.ट्रीलियन इकॉनॉमीची
वाटचाल करताना सर्व विभागाला सोबत घेवून जात आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचे पहिल्या क्रमांकाचे नाव पुढे नेण्याचे काम हे सरकार करत आहे. टाटा ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था आहे. राज्याच्या इतिहासात पहिला उद्योग क्षेत्रातील पुरस्कार रतन टाटा यांना दिला याची नोंद ठेवली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले,आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नवीन पिढीने उज्ज्वल काम केले आहे.

प्रस्ताविकात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुरस्कार सुरु करण्यामगची भूमिका विषद केली. त्यांनी उद्योग मित्रव रोजगार मित्र या नाविन्यपूर्ण प्रकल्प तसेच उद्योग मित्र व्हॅन बाबत माहिती दिली. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, उद्योजकांना पुरस्कार हा राज्य शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हे देशातील उद्योगात अग्रेसर असलेले राज्य आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि उद्योगाच्या बाबत दूरदृष्टी असणारे राज्य म्हणुनही ओळखले जाते.  

सिरम इन्स्टिट्यूट ही देशाची, महाराष्ट्राची कंपनी आहे. कोविड काळात 90 टक्के लस हे महाराष्ट्राने पुरवले. महाराष्ट्राची कार्य संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे आपण महाराष्ट्रातच यापुढेही उद्योगाला प्राधान्य देऊ. हा पुरस्कार हा राज्य, देश सिरम इन्स्टिट्यूट मधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आहे. 

गौरी किर्लोस्कर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, उद्योग क्षेत्रात महिलांसाठी समान संधी निर्माण केल्याबद्दल राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले. उद्योग क्षेत्रातील आजोबा व वडिलांचे योगदान सांगतानाचा भारताच्या निर्माणशक्तीवर त्यांचा विश्वास होता असेही त्या म्हणाल्या.

मी एक शेतकरी असून कृषी क्षेत्रातील पुरस्कार मला मिळणे अपेक्षित होते मात्र राज्य शासनाने मराठी उद्योजक पुरस्कार दिल्यामुळे यापुढे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळण्याकडे वाटचाल सुरू झाली असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांनी एकीने शेती केली तर शेतीत निश्चितच बदल घडू शकतो. महाराष्ट्राचा शेतकरी आज युरोपात सर्वात जास्त द्राक्ष विकत आहे याचा मला अभिमान असल्याचे विलास शिंदे यावेळी म्हणाले.  यावेळी मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजनेंतर्गत यशस्वी उद्योजकांच्या यशकथांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्याक्रमाचे सुत्र संचालन अजीत भुरे यांनी तर आभार डॉ.हर्षदीप कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments