Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न ; विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश

प्रलंबित असलेल्या कामांना चालना देऊ - ना. दिलीप वळसे पाटील

कारंजा (लाड) दि. १५ 
कारंजा - मानोरा मतदारसंघातील जनसामान्यांच्या समस्या कशा सोडवायच्या, त्यांना मदत कशी करायची याबाबत सतत प्रकाशदादांच्या मनामध्ये विचारमंथन सुरु असायचे. कारंजा विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केले. प्रकाशदादांचे अपुर्ण कार्य पुर्ण करणे हीच त्यांना श्रध्दांजली असून यासाठी आपण सहकार्य करणार असल्याची भावना सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. शेतकरी निवास येथे आयोजित  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. 
     कारंजा येथे माजी आमदार स्वर्गीय प्रकाश दादा डहाके यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वन पर्यटन केंद्राला महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्व. प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र असे नाव देण्यात आले होते. या नामकरण सोहळ्या करिता ते कारंजा येथे उद्घाटक म्हणून आले होते. नामकरण फलकाचे अनावरण झाल्यानंतर वन पर्यटन केंद्रात प्रशासकीय सभा संपन्न झाल्यानंतर शेतकरी निवास येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होतो. या मेळाव्याला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके,माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसन राठोड, अमरावती जिल्हा पक्ष निरीक्षक सोनालीताई ठाकुर, यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक भाऊ परळीकर, जिल्हा परिषद सभापती अशोक डोंगरदिवे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे, आशिष दहातोंडे, पंचायत समिती सभापती प्रदीप देशमुख, पंचायत समिती उपसभापती देवानंद देवळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देवेंद्र ताथोड, उपाध्यक्ष वसंतराव लळे, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, सुरेश गावंडे, विश्वनाथ ताथोड, मते सर, नगर पालिका उपाध्यक्ष एम.टी.खान आदींची उपस्थिती होती.  पुढे श्री. वळसे पाटील म्हणाले, प्रकाश दादांचे कार्य व त्यांच्या आठवणी यामधून आपल्याला तो अनुभव घेऊन पुढे जाता येईल. त्यांच्या कुटूंबाला राजकीय वारसा होता. त्यांचे वडील स्व. उत्तमराव डहाके हे स्वातंत्र्य सैनिक होते. आई छबुताई डहाके हया सुध्दा सार्वजनिक जीवनात होत्या. प्रकाश दादा गेल्यानंतर प्रथमच या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांमध्ये पक्षाप्रती उत्साह दिसून येत आहे. डहाके कुटुंब आणि युसुफ भाई पुंजानी सोबत आल्याने ने नक्कीच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात येईल असा मला विश्वास आहे. असे ही श्री. वळसे पाटील यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांनी केले. तर संचालन प्रसन्न पळसकर व आभार देवव्रत डहाके यांनी मानले. 

"वंचित" च्या जिल्हा परिषद सदस्य, सरपंचसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच सहकार मंत्री यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष मो.युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज राठोड, प्रमोद पाटील लढे, सरपंच सरफराज अली, नासीर खान यांच्या सह धामणी व भामदेवी जिल्हा परिषद सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

मागील अनेक तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध कामांना चालना मिळावी या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी यांनी नामदार पाटील यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाच्या नगरोत्थान कार्यक्रमातंर्गत कारंजा शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी १५ कोटी ४ लाख रूपये मंजूर झाले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही योजना बंद पडली आहे. ह्या योजनेतील अडथळे दूर करून नव्याने ही योजना सुरू करावी. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा व बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा या विदर्भाकरीता अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या नदीजोड प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरु आहेत. त्या प्रस्तावात सिंचनाचे दृष्टीने वंचित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा व मानोरा तालुक्याकरीता एका उपकालव्याचे नियोजन मुळ प्रस्तावात अंतर्भूत करण्यात यावे. प्रधानमंत्री आवास योजनेचे अडथळे दूर करून सरसकट लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा. तसेच माजी आमदार स्वर्गीय प्रकाश दादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात बांधून त्या ठिकाणी स्व. प्रकाश दादा डहाके यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावे. कारंजा शहरातील पुरातन ऋषी तलाव नुकतेच वन विभागाला हस्तांतरित झाले आहे. शासकीय महसूल तसेच शहराच्या व्यावसायिक दृष्ट्या या तलावाचा सौंदर्यकरण करण्यात यावा. अशी  मागणी करण्यात आली असून नामदार पाटील यांनी आपल्या भाषणात मागणी पूर्ण करू अशी ग्वाही ही उपस्थितांना दिली आहे.


Post a Comment

0 Comments