वाशिम :- पोहरादेवी ग्रामस्थांना पोहरादेवी -उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबतची माहिती देण्यासाठी नुकतेच पोहरादेवी ग्रामपंचायत येथील सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी उपस्थित ग्रामस्थांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची माहिती सभेत सादरीकरणातून दिली.
सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिगंबर लोखंडे, तहसीलदार राजेश वजिरे, गटविकास अधिकारी श्री. बायस, पोहरादेवी सरपंच विनोद राठोड तसेच तालुकास्तरीय यंत्रणाचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी व उमरीचा विकास राज्य शासनाने मंजूर केलेल्या 493 कोटी रुपये निधीतून तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत करण्यात येणार आहे. श्रीमती बुवनेश्वर यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत किती विकास निधी मंजूर झाला आहे व या आराखड्यांतर्गत कोणकोणती कामे होणार आहे याबाबतची माहिती दिली.
त्या यावेळी म्हणाल्या की,या विकास आराखड्यानुसार केवळ पोहरादेवी व उमरीच्या मंदिराचा किंवा तीर्थक्षेत्राचा विकास होणार नसून परिसराचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. भविष्यात या विकास आराखडयामुळे रोजगार निर्मिती व पर्यटनाला चालना मिळेल तसेच परिसराचे व साधन संपत्तीचे महत्त्व वाढणार आहे. सोबतच्या या दोन्ही गावात शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी ग्रामस्थांना यावेळी दिली.
उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी काही समस्या मांडल्या.गावातील नाल्यांची व रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची करण्यात यावी.बस स्टँड चौक ते गावादरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी.तसेच अंगणवाडीची दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.पहिल्यांदा जिल्हाधिकारी यांनी गावात येऊन ग्रामस्थांशी संवाद साधून चर्चा केली व विकास आराखड्याबाबत विस्तृत माहिती ग्रामस्थांना दिली. त्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
0 Comments