पोलीस दलात कर्तव्य बजावतांना पोलीस अधिकारी व अंमलदारांनी स्वतःच्या शारीरिक तंदरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. सुदृढ, निरोगी व निकोप जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे १९ व्या ‘वाशिम जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा - २०२३’चे आयोजन दि.१७.०८.२०२३ ते दि.१९.०८.२०२३ दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मैदानी खेळ वैयक्तिक व सांघिक स्वरुपात तसेच अॅथलेटीक्स क्रीडा प्रकारातील विविध खेळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील ५३ पुरुष व १८ महिला पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
दि.२२.०८.२०२३ रोजी सदर १९ व्या ‘वाशिम जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा - २०२३’चा बक्षीस वितरण व समारोप समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दिमाखदार पद्धतीने पार पडला. दि.१७.०८.२०२३ पासून सुरु झालेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. सांघिक क्रीडा प्रकारात फुटबॉलमध्ये वाशिम उपविभागाचा संघ प्रथम स्थानी तर कारंजा उपविभागाचा संघ द्वितीय स्थानी, व्हॉलीबॉलमध्ये पोलीस मुख्यालयाचा संघ प्रथम तर कारंजा उपविभाग द्वितीय स्थानी, कबड्डीमध्ये पोलीस मुख्यालय प्रथम स्थानी तर मंगरूळपीर उपविभाग द्वितीय स्थानी राहिला. अॅथलेटीक्स क्रीडा प्रकारामध्ये ०८ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण १६ पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सुवर्ण (०८) व रौप्य पदक (०८) प्राप्त केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले व ‘पोलीस दलामध्ये तणावपूर्ण परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना सर्वांनी स्वतःच्या मानसिक व शारीरिक स्वास्थाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे’ असे प्रतिपादन केले. सदर समारोप समारंभाला वाशिम पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम.
0 Comments