Ticker

6/recent/ticker-posts

शैक्षणिक कार्यानुभवासाठी पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी जपान दौरा

प्रतिनिधी श्रावणी कामत 

पिंपरी, पुणे  - पी. जी. ते पीएचडी दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक अत्याधुनिक सेवा सुविधा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीसीईटीच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी
शैक्षणिक कार्यानुभव उपक्रम अंतर्गत पंधरा दिवसांचा जपान दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. यामध्ये टोकियो, हिरोशिमा, शिमाने या शहरातील शैक्षणिक, व्यवसायिक संस्थांना भेटी देऊन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
पीसीसीओई च्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा ठाकरे, प्रा. गीतांजली झांबरे यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांनी जपानला भेट दिली. जपानसारख्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत राष्ट्राने विज्ञान-तंत्रज्ञानात केलेली प्रगती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने या कार्यानुभव सहलीचे आयोजन करण्यात आले. या अनुभवाने विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन अधिक विस्तृत होण्यासाठी मदत होईल
 विद्यार्थ्यांना जपानी वातावरणात काम करण्याची, जपानी उद्योगातील तज्ज्ञ आणि आघाडीच्या संशोधकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यानुभवातून विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये वापरल्या जाणार्‍या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची माहिती व उपयुक्तता याबद्दल जाणून घेता आले. विद्यार्थ्यांनी टोकियो विद्यापीठ, शिबौरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिमाने विद्यापीठ आणि भूकंप संशोधन संस्था, रेल्वे तांत्रिक संशोधन संस्था आणि जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांसारख्या प्रसिद्ध संशोधन संस्थांना भेटी दिल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त जपानी विद्यापीठांमध्ये तांत्रिक कार्यशाळा आणि तज्ञांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 
   याबरोबरच टीसीएस जपान, ताकेनाका कॉर्पोरेशन, माझदा मोटर कार कंपनी, मित्सुबिशी महिंद्रा उद्योगांमध्ये विकसित होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. व्यावसायिक मूल्य शिक्षण आणि जपानी संस्कृती, कामाची नैतिकता आणि केंद्रित नियोजन यांचाही अनुभव घेता आला. कला, संस्कृती, साहित्य, प्रशासन आणि सामाजिक जबाबदारी या विषयांसह सांस्कृतिक महत्त्वाच्या विविध स्थळांच्या भेटीतून जपानची संस्कृती समजून घेता आली. या भेटीमुळे जपानी संस्थांसोबत पीसीईटीचे शैक्षणिक आणि संशोधनातील संबंध अधिक दृढ झाले.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि  पि.सी.यू. चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
------------------------------------

Post a Comment

0 Comments