जिल्ह्यामध्ये पोलीस-जनता सलोखा वृद्धिंगत होऊन समाजामध्ये पोलीसांची दृश्यमानता वाढविण्यासाठी तसेच कर्तव्याबरोबरच पोलीस अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ सुदृढ व्हावे याहेतूने दि.०८.०८.२०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या ‘सायकल पेट्रोलिंग’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन अमरावती परिक्षेत्राचे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.जयंत नाईकनवरे साहेब यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
शहरातील व गावातील अरुंद रस्ते व गल्लीबोळातून सायकलद्वारे पेट्रोलिंग करणे सहज शक्य होते त्यामुळे गुन्हे नियंत्रण व प्रतिबंध करण्यास मदत होऊन समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उद्दिष्ट्य साध्य होण्यास मदत होते. शहरातील सराफा लाईन, आठवडी बाजार, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे, प्रार्थनास्थळे तसेच शाळा-महाविद्यालय सारख्या महत्वाच्या ठिकाणी सायकलद्वारे उत्कृष्टपणे गस्त करता येते. सायकलने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या मनात पोलीसांप्रती आपलेपणाची भावना निर्माण होते. सायकल पेट्रोलिंगच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व अंमलदारांना कर्तव्याबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थाची सांगड घालता येणार असून त्याचबरोबर प्रदूषणामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळता येईल व समाजामध्ये निसर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश आपल्या कृतीद्वारे देता येईल. ‘सायकल पेट्रोलिंग’ करिता ०६ तालुका पोलीस स्टेशनस्तरावर ०३ तर इतर ०७ पोलीस स्टेशनस्तरावर ०२ अशा एकूण ३२ सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी मा.श्री.जयंत नाईकनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांनी जिल्ह्यातील कायदा व्यवस्थेचा आढावा घेतला व सायकल पेट्रोलिंग या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी वाशिम पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ०८ अधिकारी व ३२ अंमलदार अशा एकूण ४० पोलीस अधिकारी/अंमलदारांचा मा.श्री.जयंत नाईकनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर श्रीमती नीलिमा आरज व उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री.जगदीश पांडे, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सर्व शाखा अधिकारी व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
0 Comments