"निलेश देशमुख सारख्या मुजोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार" : स्वप्नील कांबळे (आरपीआय शहराध्यक्ष)
पिंपरी :(४ ऑगस्ट)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रभरातील सनदी अधिकारी सहभागी असलेल्या एका व्हाट्सअप ग्रुप वर पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांबाबत अत्यंत अपमान जनक वक्तव्य केल्याबद्दल देशमुख यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकारांनी केली आहे. त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पत्रकारांचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान असल्याच्या भावनेतून पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष स्वप्निल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरभर तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे पत्र आज महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यालयात देण्यात आले.
या पत्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून कर वसुलीच्या नावाखाली सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना त्रास दिल्याबाबतच्या अनेक तक्रारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांना मिळत आहेत, पण शहर विकासासाठी कर संकलन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे आम्ही जाणतो त्यामुळे वारंवार तक्रारी येऊनही आम्ही याबाबत कठोर भूमिका घेतली नाही पण काही दिवसांपूर्वी राज्यभरातील सनदी वरिष्ठ अधिकारी सहभागी असलेल्या एका व्हाट्सअप ग्रुप वर निलेश देशमुख यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांबद्दल अत्यंत निंदाजनक वक्तव्य केले असून सन्माननीय पत्रकारांच्या बाबतीत जर हे अधिकारी एवढे मुजोरपणाने वागत असतील तर सर्वसामान्य नागरिकांशी ते कशा पद्धतीने वागत असतील? हे स्पष्टपणे दिसते. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान आहे असे आम्ही समजतो आणि तो करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रेकॉर्ड ब्रेक कर संकलन केले याचा अर्थ त्यामागील घोटाळे लपले जातील असे नाही, यासंदर्भात तात्काळ चौकशी करावी अशी आमची मागणी आहे, शिवाय पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांना 'छचोर, रक्ताची चटक लागलेले लांडगे, मांडव टाकून पत्रकार परिषद घ्याव्या लागतील' असे संताप जनक संबोधन देशमुख यांनी केले आहे त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना 'महापालिकेत प्रवेश निषिद्ध करावा' असेही अकलेचे तारे त्यांनी संबंधित ग्रुपमध्ये तोडले आहेत. तरी आम्ही आपणास नम्रपणे विनंती करतो की, शहरातील मान्यवर पत्रकारांचा तथापि संविधानाचा अपमान करणाऱ्या निलेश देशमुख सारख्या मुजोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकारांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी सभासद, कार्यकर्ते तसेच हजारो नागरिकांसह शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांसोबत आरपीआय (आठवले) पिंपरी चिंचवड शहर ठामपणे उभे आहोत.
तरी आपण सदर पत्राचा सकारात्मक व गांभीर्यपूर्वक विचार करून कारवाई कराल अशी अपेक्षा.
0 Comments