पारंपरिक जैविक निविष्ठांची केली पाहणी
वाशिम
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत स्थापन केलेल्या रिसोड तालुक्यातील नेतंसा येथील योगऋषी शेतकरी उत्पादक कंपनीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी 18 ऑगस्ट रोजी भेट देऊन राज्यातील पहिल्या परंपरागत जैविक निविष्ठा केंद्राची पाहणी केली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे,तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भेटीत कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या या पहिल्या माती केंद्रावर (परंपरागत जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र) शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या ४० जैविक निविष्ठा व त्याची उपयुक्तता याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा आणि कंपनीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.
श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करून सेंद्रिय उत्पादन, पॅकेजिंग,ब्रॅण्डिंग व मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले.मानव विकासअंतर्गत लाभ दिलेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळेत तयार करण्यात येणारे ट्रायकोडर्मा व ग्रानुल्स या निविष्ठांची माहिती दिली.
शेतबांधावरील प्रयोगशाळेत बीएससी द्वितीय वर्षाला असलेल्या गायत्री बाजड हिने तयार केलेले ट्रायकोडर्मा पाहून तिचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.
श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या की,शेतकऱ्यांच्या मुलांनी एक दिवस तरी शेतात येऊन या गोष्टीत आपल्या आई-वडिलांना मदत करावी व हा वारसा पुढे चालवावा.
शेतकरी उत्पादक कंपनी,महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे,समृद्धी महामार्गाचा उपयोग करून जिल्ह्याबाहेर उत्पादन विक्री करणे याबाबत चर्चा केली.
0 Comments