Ticker

6/recent/ticker-posts

बळीराजाने सोयाबीन पिकाच्या संरक्षणाकरीता फवारणीच्या उपाययोजना कराव्यात.


    प्रतिनिधी संजय कडोळे :  
  
जिल्‍हयात सोयाबीन पिक वाढीच्‍या अवस्‍थेत आहे. काही ठिकाणी सोयाबीन फुलोरा अवस्‍थेत आहे. अशातच काही ठिकाणी सोयाबीनवर किड व रोगाचा अल्‍प प्रादुर्भाव आढळुन येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना सूचविलेल्या आहेत.

          हिरवी अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्‍यासाठी सर्वेक्षणाकरीता प्रति हेक्‍टरी हिरव्या अळीसाठी 5 व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी 5 कामगंध सापळे शेतामध्‍ये लावावेत. इंग्रजी  “T” आकाराचे हेक्‍टरी 10 ते 15 पक्षी थांबे शेतात लावावे. पेरणीनंतर 25 दिवसापर्यंत 5 टक्‍के निंबोळी अर्काची पहीली फवारणी करावी. निरीक्षणे घेण्‍याकरीता हेक्‍टरी 5 कामगंध सापळे लावून नियमित नि‍रीक्षणे घ्‍यावीत व आर्थिक नुकसान पातळीच्‍यावर किडीची संख्‍या आढळल्‍यास तात्‍काळ शिफारशीत किटकनाशकाची फवारणी करावी. च‍क्रीभुंगा प्रति मिटर 3 ते 4 अळया, खोडमाशी 10 टक्‍के प्रादुर्भावग्रस्‍त झाडे, हिरवी उंट अळी 4 लहान अळया प्रति मिटर ओळीत, स्‍पोडोप्‍टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी) 3 ते 4 अळया प्रति मिटर ओळीत, जास्‍त आढळल्‍यास नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्‍यात.
 तंबाखुवरील पाने खाणाऱ्या (स्‍पोडोप्‍टेरा) अळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी एस.एल.एन.पी.व्‍ही. 500 एल ई विषाणुची 2 मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमोरीया रिलाई या बुरुशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. रासायनिक घटकांची फवारणी करत असतांना शेतकऱ्यांनी सर्व सुरक्षाविषयक किटचा वापर करावा. (टोपी, चष्‍मा, मास्‍क, अंगावर सुरक्षा कपडे परिधान करणे, हात मोजे, गम बुट ई.) फवारणी वारा शांत असतांना सकाळी किंवा सायंकाळी करावी, फवारणी करीत असतांना तंबाखू खाणे, धूम्रपान करणे किंवा मद्यपान करु नये.

          सोयाबीन पिकावर येणाऱ्या किडींसाठी किटकनाशके पुढीलप्रमाणे आहे. पाने खाणाऱ्या अळया (उंटअळी, केसाळ अळी, घाटे अळी, तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळी.) किटकनाशक फवारणी - प्रोफेनोफोस 50 ई.सी. 400 मिली किंवा क्‍लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एस.सी. 60 मिली किंवा इन्‍डोक्‍झाकार्ब 15.8 ई.सी. 140 मिली वापरावे. चक्री भुंगा (गर्डल बिटल) किटकनाशक फवारणी - क्‍लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एस.सी. 60 मिली किंवा थायक्‍लोप्रीड 21.7 एस.सी., 300 मिली किंवा इथीऑन 50 ईसी 600 मिली किंवा थायमिथाक्‍झाम 12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 झेड.सी 50 मिली. आणि

खोडमाशी (स्‍टेमफ्लाय) किटकनाशक फवारणी - क्‍लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एस.सी. 60 मिली किंवा इथीऑन 50 ईसी 600 मिली वापरावे.  

          सोयाबीन पिकावर येणाऱ्या रोगांसाठी शिफारशीत बुरशीनाशके- ताबेंरा - बुरशीनाशक फवारणी - हेक्‍साकोनाझोल 5 टक्‍के इ.सी. 10 ग्रॅम किंवा क्रसॉक्‍सीम मिथील 44.3 एस. सी. 10 मिली, प्रोपीकोनाझोल 25 टक्‍के ई.सी. 10 ग्रॅम. पानावरील ठिपके किंवा शेंगावरील करपा - बुरशीनाशक फवारणी - पायरॅक्‍लास्‍ट्रॉबीन 20 टक्‍के डब्‍लु. जी. 8 ते 10 ग्रॅम किंवा टेब्‍युकोनाझोल 25.9 टक्‍के ई. सी. 12 मिली, टेब्‍युकोनाझोल 10 टक्‍के + सल्‍फर 65 टक्‍के डब्‍लू जी. 25 ग्रॅम याप्रमाणे वापरावे. अशाप्रकारे सोयाबीन पिकावर येणाऱ्या रोगांसाठी किड व रोगाचे व्‍यवस्‍थापन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments