Ticker

6/recent/ticker-posts

गोवा महामार्ग व कोकणच्या भल्यासाठी, झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी9 ऑगस्ट क्रांतीदिनी पत्रकारांचे बोंबाबोंब आंदोलन व 10 हजार एस.एम.एस.चा भडीमार होणार


प्रतिनिधी श्रावणी कामत 

 मुंबई-गोवा महामार्ग व कोकणाच्या भल्यासाठी जनतेसह कोकणातील पत्रकार 9 ऑगस्ट क्रांतीदिनी बोंबाबोंब आंदोलन करणार असुन त्याचवेळी राज्यकर्त्यांना एकाच दिवशी दहा हजार एस.एम.एस. पाठविण्यात येणार आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी सनदशिर मार्गाने होणाऱ्या आंदोलनात पत्रसृष्टी व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे  मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे.

एस.एम.देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गोवा महामार्गासाठी कोकणातील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत.. 9 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलन होत आहे.. 'पुन्हा एकदा' हा शब्दप्रयोग यासाठी की, 2007 पासून पत्रकार महामार्गासाठी शांततेच्या मार्गानं आंदोलनं करीत आहेत.. अनेकांना वाटतं अशा 'गुळचट आंदोलनांनी' निगरगट्ट राजकारण्यांना घाम फुटत नाही.. 'डोकेफोड आंदोलन' झालं पाहिजे .. तशा सूचना ते सोशल मिडियावरून  करीत असतात..शांततामय आंदोलनाचा मार्ग मान्य नसणारे आणि हिंसक आंदोलनाचा आग्रह धरणारे हे सगळे "फेसबुक वीर" आहेत.. वातानुकूलीत घरात बसून ते मारामारीच्या गोष्टी करतात.. ही मंडळी चळवळीत कधीच येत नाही.. त्यामुळे अशा भंपक सूचनांचा आमच्यावर परिणाम होणार नाही.. मला गांधी जवळचे असल्यानं मी हिंसेवर विश्वास ठेवत नाही.. गांधीजींनी मीठ उचलून, उपोषणं करूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे आम्ही विसरलो नाहीत.. आम्ही देखील 2007 ते 2012 अशी पाच वर्षे शांततेच्या, सनदशीर मार्गानंच आंदोलन करून महामार्गाचं काम सुरू करायला सरकारला भाग पाडलं हे हिंसेच्या गोष्टी करीत आम्हाला भडकविणारे विसरतात.. 9 ऑगस्ट चे आंदोलन नेहमीप्रमाणे शांततेतच होईल.. पत्रकारांच्या सतत पाच वर्षांच्या आंदोलनानंतर महामार्गाचं काम सुरू झालं..पण ते तब्बल 13 वर्षे  रखडलं. रखडलं  म्हणण्यापेक्षा रखडविलं गेलं असं म्हणणं संयुक्तिक ठरेल..  अर्थातच हे पाप कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं ..  कारण ते या विषयावर बोलतंच नाहीत.. जणू त्यांना हा विषयच वर्ज्य. कदाचीत मणिपूरच्या प्रश्नावर न बोलण्याची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणातील या मौनी पुढाऱ्यांकडूनच घेतलेली असावी .. आपल्याला सोयीच्या नसलेल्या विषयावर मौन हे अनेक पुढाऱ्यांना आपल्या कूटनीतीचा भाग वाटतं..  कोकणच्या पुढाऱ्यांची हीच भावना असावी.. म्हणून ते बोलतच नाहीत.  त्यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध आहेत असंही सांगितलं जातंय..  काल पुण्यात मोदी विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या मणिपुरी मुलांच्या हातातील एक फलक लक्ष वेधून घेत होता.. ‘सायलन्स इज्‌ व्हायलन्स’ असा मजकूर फलकावर होता.. संवेदनशील विषयावरचं नेतृत्वाचं मौन एकप्रकारे हिंसाचाराला प्रेरणा देणारं असतं असंच हा फलक सुचवत होता.  कोकणातील पुढाऱ्यांचही हे मौन लोकभावना भडकवत आहे हे नक्की.. कारण या विषयावरून कोकणात मोठा असंतोष आणि आक्रोश आहे.. कोकणातील नेत्यांना या संतापजनक मौनातून बाहेर आणलं पाहिजे..  या विषयावर बोलायला लावलं पाहिजे.. यासाठीच 9 तारखेला आम्ही बोंबाबोंब आंदोलनाबरोबरच एक वेगळा प्रयोग करीत आहोत.. एस.एम.एस. आंदोलन करीत आहोत.. म्हणजे मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, पालकमंत्री आणि सत्तेत वाटेकरी असलेल्या रायगडच्या दोन्ही खासदारांना किमान 10,000 एस.एम.एस. पाठविणार आहोत.. यातून दोन गोष्टी होतील,  मुंबई - गोवा महामार्गाबाबतंच्या संघटीत भावना  पुढाऱ्यांना कळतील.. त्याची थेट झळही त्यांना लागेल..  आणि या पुढाऱ्यांच्या  निष्क्रीयतेमुळे महामार्ग रखडलयाचं पुन्हा एकदा जगासमोर येईल .. आजपर्यंत हे सारे पुढारी भूसंपादन होत नाही, ठेकेदार पळून जातात अशी तकलादू कारणं देऊन स्वतःची कातडी वाचवत होते.. परंतू हे खरं नाही..पुढाऱ्यांचं मतलबी मौनामुळेच हा रस्ता रखडला आहे.. हे उघड गुपित आहे..

त्यामुळे आता कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींवर दबाव वाढविला पाहिजे.. निवडणुकांच्या तोंडावर संघटीत जनमत आपल्या विरोधात जाणं कोणत्याच  पुढाऱ्याला परवडणारं नसतं .. त्यामुळं मोदी मणिपूरवर बोलले नाहीत तरी कोकणातील पुढारी आम्ही त्यांच्या नावानं जेव्हा बोंबा मारायला लागू तेव्हा मुंबई - गोवा महामार्गावर  बोलायला लागतील..हे नक्की.. कोकणातील जनतेला,अगदी घरी बसून या आंदोलनात सहभागी होता येईल..त्यांनी फक्त एक एस.एम.एस.  लोकप्रतिनिधींना पाठवायचा आहे.. तुमच्या भावना थेट लोकप्रतिनिधींपर्यत पोहचल्यानंतर नक्कीच त्यांना मौन सोडावं लागेल.. बोलावं लागेल..लक्षात ठेवा मुंबई गौवा महामार्ग मार्गी लागण्यासाठी आपला एक एस.एम.एस.  लाख मोलाचा ठरणार आहे..  किमान दहा हजार एस.एम.एस.  पाठविले जावेत अशी आमची अपेक्षा आणि तसा प्रयत्न आहे.. एस.एम.एस. कोणाला पाठवायचे? त्यांचे फोन नंबर्स, एस.एम.एस. चा मजकूर हा सारा तपशील 6 तारखेला दिला जाईल.. हे सारे एस.एम.एस.  एकाच दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट रोजीच पाठविले जावेत अशी पत्रकार आणि जनतेला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी विनंती केली आहे. या आंदोलनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, यांच्यासह पत्रसृष्टी व जनतेचा सहभाग असणार आहे.

Post a Comment

0 Comments