गेल्या काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना ड्रेसकोड परिधान करावा, अशी नियमावली देशभरातील वेगवेगळ्या मंदिरात लागू करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील अनेक ठिकाणी अशीच काही नियमावली लागू करण्यात आली आहे. तर याला काही ठिकाणी पाठींबा मिळत असून, काही ठिकाणी विरोध देखील होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात देखील अशी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. कारण याबाबत शहरांतील वेगवेगळ्या 20 मंदिरात ड्रेसकोडबाबत फलक लावण्यात आले आहे. शहरातील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत.
मंदिरात प्रवेश करताना भारतीय परंपरेला शोभणारीच वस्त्रे परिधान करावीत, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. त्यानंतर राज्यसह देशातील अनेक मंदिरात ड्रेसकोडबाबत निर्णय घेण्यात आले. अश्लील, बीभत्स, उत्तेजक वस्त्र परिधान करू नयेत, असे निर्णय घेत त्याबाबत मंदिरात फलक लावण्यात आले आहेत. तर आता छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात देखील असेच फलक लावण्यात आले आहे. शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक पाहायला मिळत आहे.
0 Comments