विनापरवाना घातक धारदार शस्त्र खंजीर व देशी कट्टा बाळगत समाजामध्ये धाक, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पो.स्टे.वाशिम शहर तपास पथकाने तीन दिवसांत वाशिम शहरातील ०४ आरोपींविरुद्ध कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई केली आहे.
दि.२७.०६.२०२३ रोजी पो.स्टे.वाशिम शहर हद्दीतील जुनी नगर परिषद परिसरात शस्त्रासह फिरणाऱ्या सत्यजित मारोती वानखडे नामक २५ वर्षीय युवकास व महात्मा फुले चौकात शस्त्रासह फिरणाऱ्या अभिषेक सुभाष भुजाडे, वय २० वर्षे यास ताब्यात घेत पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार लोखंडी खंजीर मिळून आले. सदर युवकांविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे अनुक्रमे अप.क्र.५५६/२३ व अप.क्र.५६१/२३, कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर दि.२८.०६.२०२३ रोजी वाशिम शहरातील समता नगर, अल्हाडा प्लॉट येथे राहणाऱ्या देवानंद नारायण वानखडे वय २६ वर्षे याने त्याचे राहत्या घरात खंजीर लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यावरून त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घरातील पलंगाखाली एक धारदार लोखंडी खंजीर मिळून आला. त्यामुळे सदर युवकाविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५६४/२३, कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दि.२९.०६.२०२३ रोजी पेट्रोलिंगदरम्यान वाशिम शहरातील हिंगोली नाका परिसरात राधेश्याम चंदू देशकर, वय ३९ वर्षे, रा.शुक्रवार पेठ, मन्नासिंग चौक, वाशिम हा इसम देशी पिस्टल बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून हिंगोली नाका येथील वडाच्या झाडाजवळ सदर इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ देशी बनावटीची एक पिस्टल मिळून आली. सदर इसमाचे विरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५६९/२३, कलम ३, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या कारवाया मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते, पोनि.गजानन धंदर, पोउपनि.सचिन गोखले, पोहवा.श्रीवास्तव, पोकॉ.महादेव भिमटे, उमेश चव्हाण, संदीप दुतोंडे यांनी पार पाडल्या. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.
( जनसंपर्क अधिकारी )
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम.
0 Comments