आगामी सण, उत्सव, आषाढी एकादशी, बकरी ईद व सद्यस्थितीमध्ये राज्यातील वातावरण पाहता मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) हे समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सामाजिक एकोपा निर्माण व्हावा व सर्वांनी सर्वधर्मसमभावाने गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी सतत उपक्रमशील व प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी आषाढी एकादशी व बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे.
आगामी काळात आषाढी एकादशी हा हिंदू बांधवांचा व बकरी ईद हा मुस्लीम बांधवांचा खूप महत्वाचा सण आहे. त्यानुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून पोलीस स्टेशन स्तरावर शांतता समितीच्या बैठका घेत नागरिकांना शांततेत आपले सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलाचे वतीने ०१ अपर पोलीस अधीक्षक, ०१ परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक, ०२ पोलीस उपअधीक्षक, ०१ परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, १६ पोलीस निरीक्षक, ६५ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, ९०० पेक्षा जास्त पोलीस अंमलदार, ०२ SRPF ची पथके, ५०० पेक्षा जास्त होमगार्ड इतका बंदोबस्त नेमण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक तैनात करण्यात आले असून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेऱ्यांसह पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
‘समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदत सर्वधर्मसमभाव बाळगावा, ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संतवचनाप्रमाणे एकमेकांना मदत करत मिळून मिसळून राहण्याबाबत आवाहन केले. त्याचबरोबर सर्वांनी एकमेकांशी बांधिलकी जोपासत कायद्याचे पालन करावे अन्यथा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.’ असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.
आगामी सण, उत्सव व बकरी ईद शांततेत पार पाडण्याकरिता वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज असून सर्वांनी शांतता राखत सण, उत्सव व बकरी ईद साजरी करावी व कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक कार्यालय,
वाशिम यांचेकरिता
0 Comments