महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून सुरू होणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे सेनेला राज्यभरातील तळागाळात नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा प्रचार करणं ही सध्याची राजकीय खेळी दिसून येत आहे.
सुमारे नऊ तास एकनाथ शिंदे प्रभू रामाच्या नगरीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुमारे 9 तास प्रभू रामाच्या नगरीत घालवतील. प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. शिंदे मंदिराचं बांधकाम पाहतील. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या मुक्कामासाठी मंदिर नगरातील जवळपास सर्व हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळा बुक करण्यात आल्या आहेत. शिंदे सरकारचे अनेक मंत्री आज सायंकाळपर्यंत अयोध्येत पोहोचणार आहेत. सीएम शिंदे यांचे अयोध्येत जल्लोषात स्वागत होणार आहे. यासाठी शिवसैनिक विशेष गाड्यांमधून एक दिवस आधी अयोध्येला पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिला अयोध्या दौरा
मुख्यमंत्री झाल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा हा पहिला अयोध्या दौरा आहे. एकनाथ शिंदे यांनी 25 नोव्हेंबर 2018 रोजी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते म्हणून राम नगरीला भेट दिली होती. 7 मार्च 2020 रोजी एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री म्हणून अयोध्येला भेट दिली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात 15 जून 2022 रोजी मंत्री म्हणून शिंदे यांनी तिसर्यांदा अयोध्येत हजेरी लावली होती. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला तर नेता म्हणून चौथा अयोध्या दौरा आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठा संदेश देण्याची तयारी सुरु आहे. शिवसेनेचा शिंदे गट हिंदुत्वाच्या अजेंड्यावर स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा प्रभावी भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी झाली आहे. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच अयोध्येत दाखल झाले असून ते या दौऱ्याची वातावरण निर्मिती करत आहेत. तर शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील नेत्यांप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही मैदानात उतरले आहेत. भाजपने गिरीश महाजन, आशिष शेला या दोन नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे.
0 Comments