कार्यकर्ता ही झपाट्याने दुर्मिळ होणारी प्रजाती बनली असताना जीवनाची चार दशके अजूनही कुणी स्वतःला कार्यकर्ता समजून तेही अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या क्षेत्रात झोकून त्याच उत्साहाने काम करीत असेल हे जवळून अनुभवायचे असेल तर अकोल्यात शरद वानखडे याना भेटावे. सामाजिक कार्य म्हणजे '' घरकी रोटी खाव और मामू की बकरी चराव '' असे म्हटले जाते. हेच काम सतत केल्यावर अनेकांना लोकांचे वर्तन,अनुभव बघून चीड येते. बस झालं ! आणखी किती दिवस लोकांच्या सतरंज्या उचलायच्या ? असे वाटून त्याला नैराश्य सुद्धा गाठते मात्र सतत चाळीस वर्ष होऊनही कुणी याच कामात स्वतःला गुंतवून ठेवत असेल तर त्याने हाती घेतलेले कार्य किती मोठे असेल आणि त्याने कार्यकर्त्याचे संपूर्ण जीवनाचं कसे व्यापून टाकलेले असेल याची कल्पना येते. शरद वानखडे हा कुण्यातरी ध्येयाने जगणे झपाटून गेलेला हाडाचा कार्यकर्ता म्हणावा लागेल.
परवा शरद वानखडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपमुख्य कार्यकारी पदावरून निवृत्त झाले. बॅंकेतला माणूस म्हटलं की अतिशय निरुत्साही आणि चेहऱ्यावरील माशीही उडू न देणारा टिपिकल कर्मचारी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. शरद वानखडे याला अपवाद ठरलेला माणूस आहे. बँकेतील माणूस म्हटले की त्याच्या एवढे आर्थिक गणित इतर कुणालाही जुळवता येणार नाही ,थोडक्यात कसलातरी लाभांश पदरात पडल्याशिवाय तो जागेवरचा हलणार सुद्धा नाही मात्र बँकेत राहूनही सामाजिक तळमळीपोटी पैश्याला कधीही अनावश्यक किंमत न देणारा शरद सारखा कार्यकर्ता बघितला की अजूनही तत्वाच्या कठीण मार्गावर चालणारे असंख्य पाऊले भवताल टिकून आहेत याचा '' हरीक '' येते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणे म्हणजे दररोज घरावर गोटे घेण्याचे काम असते. आपलेच नातेवाईक ज्याला मानतात त्याच्या विरोधात भूमिका घेणे म्हणजे खायचे काम नाही.
१९८२ सालात नागपुरात प्रा. श्याम मानव यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. त्याच काळात मानव सर लोकमत मध्ये '' युवास्पंदन '' नावाचा स्तंभ चालवत होते. त्याकाळात मानवांचा हा स्तंभ सर्वाधिक वाचला जायचा.मानव सर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले होते , ८५-८६ त्यांच्या अकोला दौऱ्यात नितीन ओक,संजय चंदनगीर,अशोक घाटे असे अनेक तरुण जुळले त्यात शरद वानखडे यांचाही समावेश होता. या चार दशकांच्या काळात जग बदलण्याच्या उमेदीने ज्यांनी या कार्यात उड्या घेतल्या त्यातील अपवाद वगळता कुणीही बाजूला होऊ शकले नाही कारण या मेंदूमुक्तीच्या विचारात एवढे सामर्थ्य आहे की हा विचार पुढे चळवळीत आलेल्या कार्यकर्त्याचा जगण्याचा भाग बनतो. शरद वानखडे त्याला अपवाद नाहीत. चार दिवसांपूर्वी शरदाचा हॉटेल नैवैद्यम प्रांगणात सत्कार झाला.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची वैचारिक अन संपर्काची श्रीमंती काय असते याचे सुंदर दर्शन या सोहळ्यात घडले. आजच्या धावपळीच्या काळात श्रापासून आठदहा किमी अंतरावर कुणाच्या प्रेमापोटी हजारो लोकांनी जमणे हे दुर्मिळ दृश्य झाले आहे. परंतु शरद वानखडे यांनी गेल्या चार दशकात सामाजिक क्षेत्रात जे काही काम केले , लोकांची मदत केली .ऐन दिवाळीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या असंख्य कुटुंबाला भेटी दिल्या त्यांच्या घरात शिधा आणि गोडधोड पोहोचवले त्याचा हा परिणाम होत. ज्यांना थोड्याश्या कामाची भरपूर प्रसिद्धी घ्यायची असते असे असंख्य लोक आजच्या काळात न केलेल्या कामाचीही दवंडी पिटत असतात परंतु शरद वानखडे आणि प्रदीप गुरुखुद्दे या मित्रांनी राबवलेल्या अनेक रचनात्मक उपक्रमाचा ते साधा उल्लेखही करीत नाहीत याचा अर्थ त्यांची बांधिलकी नेमकी कशाशी आहे याची त्यांना उत्तम जाणीव आहे.
अंनिसचे काम करणे म्हणजे खिश्याला भुर्दंड, मानसिक त्रास आणि नातेवाईकांची नाराजी ओढवून घेणे असते. तुम्ही अंनिसचे काम करता हे एकदा लोकांना माहित पडले की पुढे लोकच तुम्हाला आराम करू देत नाहीत. कोणत्याही गावात भूत,भानामती,मंत्रतंत्र,जादूटोणा ,करणी,चमत्कार यापैकी काहीही असू दे ,अर्ध्या रात्री फोन करून लोक कार्यकर्त्याला साद घालतात. हे जणू माझेच व्यक्तिगत काम असल्याचे समजून कार्यकर्ता मिळेल त्या वाहनाने लोकांच्या मदतीला जातो ,एवढी वर्ष निराशेचा एकही शब्द जिभेवर न आणता सतत काम करतो याचा अर्थ तो आतून झपाटलेला असतो हे झपाटलेपण बँकेच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर सुद्धा शरद वानखडे या माणसात तुम्ही बघू शकता. शुकदास महाराज,परिअम्मा,शेळकेबाबा,गुलाबबाबा ,बोलका पत्थर ,जादूटोणा विरोधी अभियान,अश्या आजवर शेकडो भांडाफोड आणि रचनात्मक अभियानात कस लागून भट्टीतून तावून सुलाखून निघालेले प्रबोधनाचे खरे सोने काय असते याची साक्ष शहर वानखडे यांचे ककं देते.
लोकांना असे वाटते की अनिसवाले म्हणजे देवा,धर्माच्या विरोधात बोलणारे, नास्तिक लोक . केवळ हिंदूंच्या बुवाबाबाचा भांडाफोड करणे हेच एकमेव काय याना आहे. सुरू एखाद्या कामाचे परिशीलन अश्याच पद्धतीने केले जाते. ज्यांनी जवळून या चळवळीचे काम बघतील ते पुढे यात सहभागी झाले. शुकदास महाराज प्रकरणात तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव गावंडे यांनी अनिसच्या विरुद्ध भूमिका घेतली असताना हिन्दुसेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीळ मात्र श्याम मानव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. देशभर ज्यांनी ज्यांनी आधी विरोध केला ते सगळे पुढे या कामात स्वतःहून ओढले गेले आहेत एवढी खोली या कार्याची आहे . शरद वानखडे तेवढी खोली घेऊन फिरणारा आपल्यातला कार्यकर्ता म्हणून मला आवडतो. आजही त्याच्या घरापुढे असणारा चपला ,जोड्यांचा ढीग बघून त्याच्या श्रीमंतीचे मोजमाप करता येते. अशी श्रीमंती चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. -पुरुषोत्तम आवारे पाटील
0 Comments