Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो, त्यातच वेगवान घडामोडी घडत असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत, आणि या चर्चांच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आहे.


2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन वळणं येताना दिसत आहेत, त्यातच आता मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजाकारणातल्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो, त्यातच वेगवान घडामोडी घडत असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत, आणि या चर्चांच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली. त्याचवेळी अजित पवारांनी त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द केले. एवढच नाही तर अजितदादांनी त्यांचा कॉनव्हॉय आणि स्टाफही सोडला आणि ते खासगी वाहनातून निघून गेले.

अजित पवार नेमके कुठे गेले? अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले का? अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच अजित पवार आज सकाळी माध्यमांसमोर आले. आपली तब्येत बरी नसल्यामुळे कार्यक्रम रद्द केल्याचं अजित पवार म्हणाले.

एकीकडे महाविकासआघाडीच्या माध्यमातून राज्यभरात वज्रमूठ सभांचं आयोजन करण्यात येत आहे, पण मागच्या काही दिवसांमध्ये फक्त हिडेनबर्ग रिपोर्ट नाही, तर सावरकर मुद्दा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद, यावरून राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतली आहे.सावरकरांच्या मुद्द्यावरून तर शरद पवारांनी राहुल गांधी यांच्यासमोरच दिल्लीतल्या विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या डिग्रीचा वाद सुरू असतानाच अजित पवारांनी मात्र पदवीचा मुद्दा महत्त्वाचा नसल्याची प्रतिक्रिया दिली. 2014 साली जनतेने मोदींना त्यांची पदवी पाहून मतदान केलं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे, तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकासआघाडीमध्ये असतानाही घेतलेल्या या तीन वेगळ्या भूमिका यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.


Post a Comment

0 Comments