जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेली जमापुंजी काही चोरटे चोरून नेतात. त्यामुळे फिर्यादीस मोठ्या मानसिक व आर्थिक त्रासाचा सामना करावा लागतो. वाशिम जिल्हा पोलीस दल नागरिकांचे व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सदैव सतर्क व दक्ष आहे.
त्याचाच एक भाग म्हणून मालमत्तेच्या गुन्ह्यात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरी, घरफोडी सारख्या गुन्ह्यातील तसेच गहाळ झालेले मोबाईल, मोटारसायकल व इतर किंमती साहित्य असलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनमधील मालखान्यात तसाच पडून न राहता लवकरात लवकर मूळ मालकांना परत मिळावा यासाठी सातत्याने मुद्देमाल परत मोहीम वाशिम पोलीस दलामार्फत राबविल्या जातात. मागील वर्षी सुद्धा दि.१५.१२.२०२१ रोजी १.१ कोटी रुपयांचा मुद्देमाल तर दि.२१.०५.२०२२ रोजी ८७.२३ लाखांचा मुद्देमाल विशेष मुद्देमाल मोहीम राबवून परत केला आहे. दि.०३.०३.२०२३ रोजी मा.श्री.जयंत नाईकनवरे (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांच्याहस्ते ६८ तक्रारदार/फिर्यादींना सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रुपये १.३ लाख, दुचाकी वाहने ३.४५ लाख, चारचाकी वाहने ३६ लाख, सोयाबीन सह इतर शेतमाल ४६.४२ लाख, मोबाईल फोन ६ लाख व ८३ हजारांचा इतर मुद्देमाल असा तब्बल ९४ लाखांचा मुद्देमाल या मोहीमेअंतर्गत परत करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलाने वर्षभरात ०३ मुद्देमाल परत मोहीम राबविल्या असून त्यामध्ये एकूण २.९३ कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. त्यामुळे आपला मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद फिर्यादींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला व पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
अशाप्रकारच्या मोहिमांमुळे अगोदरच मालमत्तेच्या नुकसानीमुळे त्रस्त असलेल्या फिर्यादींना दिलासा मिळेल व पोलीस – जनता सलोखा निर्माण होऊन जनतेशी विश्वासपूर्ण संबंध निर्माण होतील. मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये फिर्यादीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणजे लवकरात लवकर तपास होऊन सदर प्रकरणी फिर्यादीस न्याय मिळाला पाहिजे व त्याच वेगाने फिर्यादीचा सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा मूळ मालकांना परत मिळाला पाहिजे. त्यासाठी फिर्यादीला वारंवार पोलीस स्टेशनला चकरा माराव्या लागू नये, यासाठी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने वारंवार अशा मुद्देमाल परत मोहिमांचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी केले.
सदर मुद्देमाल परत मोहीम मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ जाधव, सपोनि.विजय जाधव, पोलीस अंमलदार संतोष कंकाळ, मुकेश भगत, गजानन गोटे व विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम सह सर्व पो.स्टे.चे मुद्देमाल मोहरर व त्यांचे मदतनीस यांनी मेहनत घेऊन पार पाडली.
0 Comments