वाशिम - जमिनीची फिरवाफिरवी आणी बोगस गट क्रमांक बनवून शेतकर्याची जमीन हडप केल्याप्रकरणी रिसोड तालुक्यातील मौजे अंचळ येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखेडे यांनी स्पॉट पंचनाम्याची मागणी केली आहे. अन्यथा आपण १३ मार्चपासून मुंबई येथील आझाद मैदानावर अंगाला राख लावून धरणे आंदोलन पुकारण्याचा इशारा वानखेडे यांनी ६ मार्च रोजी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मी एक दिव्यांग शेतकरी असून सध्याचे शिंदे सरकार हे शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचे वारंवार सांगीतले जाते. मात्र मौजे अंचळ येथील शेतजमिनीची फिरवाफिरवी आणि बोगस गट क्रमांक प्रकरणी स्पॉट पंचनामा करुन यातील मुख्य सुत्रधारांवर अटक करण्याच्या मागणीसाठी आपण गेल्या १४ वर्षापासून शासन आणि प्रशासनासोबत झगडत आहोत. त्यासाठी १३ दिवस आमरण उपोषण, ३ वेळा आत्मदहनाचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने मला ४ वेळा तुरुंगात डांबुन टाकले होते. भूमि अभिलेख कार्यालय रिसोड यांनी शेतातील गट क्रमांकाची शेतातील गट क्रमांकाची फिरवाफिरवी केली आहे. तसेच उपनिबंधक कार्यालय रिसोड यांनी बनावट खरेदी केली आहे. त्यामुळे मौजे अंचळ येथील २४०, २४१, २४२, व २९० या गट क्रमांकाचा स्पॉट पंचनामा व मुख्य सुत्रधारांना अटक करण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी. अन्यथा आपण येत्या १३ मार्चपासून मुंबई येथील आझाद मैदानावर अंगाला राख लावून धरणे आंदोलन करणार असून यादरम्यान माझ्या जिवाला धोका उत्पन्न झाल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा शेतकरी वानखेडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
0 Comments