नासिक
शरणपूर रोड येथील सुयोजित मॉडर्न पॉइंट या इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली अवैध देहविक्रय सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. गुन्हे शाखेने या ठिकाणी कारवाई करीत पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी एका महिलेसह मूळ गाळामालक, भाडेतत्त्वावर गाळा चालवणाऱ्या व्यक्तीसह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरणपूर रोड येथील मसाज पार्लरमध्ये अनैतिक देहविक्रय सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी यांना मिळाली. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या आदेशानुसार पथकाने ही कारवाई केली. इमारतीमध्ये अनेश अरुण उन्हवणे ( रा. उपनगर) याने दोन गाळे भाड्याने घेत त्या ठिकाणी योग वेलनेस स्पा नावाने मसाज पार्लर सुरू केले. या ठिकाणी एका महिला संशयितासह ललित पांडुरंग राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडितांना देहविक्रय करण्यास भाग पाडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे.या गुन्ह्यातील गाळामालक संशयित अनेश अरुण उन्हवणे याने सागर ओमकार अग्रवाल आणि पीयूष ओमकार अग्रवाल यांच्याकडून गाळा बाळा भाडेतत्त्वावर घेतला होता. या सर्वांनी संगनमत करून हा व्यापार
केल्याचे समजते. या सर्वांविरुद्ध
सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे.
0 Comments