गाय फसली कचऱ्यात
नागरिकांमध्ये नाराजी चा सूर
कारंजा (लाड) : शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता कारंजेकरांनी या नऊ महिन्यात गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले. आगामी गुढीपाडवा, झुलेलाल जयंती, रमजान महिना तसेच रामनवमी, बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी महत्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा सफाई कामे होत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी नगरपालिका प्रशासन विरुद्ध निर्माण झाली आहे.
आधीच कारंजा शहर जणू शंभर टक्के रस्ते खड्डेयुक्त झाले आहे. त्यात आता कचऱ्यामुळे अस्वच्छतेची भर पडल्याने नागरिकांचा श्वास गुदमरतो आहे. शहराची ही झालेली अवस्था लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांसाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरली आहे. मात्र प्रत्यक्षात या लोकप्रतिनिधींना फारसे सोयरसूतक नसल्याचे त्यांच्या एकूणच चुप्पीवरून दिसून येते. अर्थात, काही लोकप्रतिनिधी याला अपवाद असले तरी त्यांची संख्या अगदीच नगण्य असल्याने त्यांच्या आंदोलनाचा प्रशासनावर काहीएक फरक जाणवत नाही. जांब रस्त्यावरील गांडुळ प्रकल्प आणि डम्पिंग यार्ड असले तरी तेथे कोणतीही प्रक्रिया होताना दिसत नाही. त्यामुळे हे प्रकल्प नावालाच उरले आहे. ठिकठिकाणचे कचऱ्याचे हे ढिगारे जणू मिनी अनधिकृत डम्पिंग यार्ड बनले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरपरिषदेने कचरा विलगीकरणासाठी अभिनव पध्दत शोधून काढली आहे. वसाहतीतील प्रमुख चौक, रस्त्यावर कचºयाचे ढिग टाकले जातात. यात ओला- सुका असा सर्वच प्रकारचा कचरा टाकला जातो. या ढिगावर मोकाट वराह स्वछंदपणे आपले खाद्य शोधून ओला कचरा जागेवरच नष्ट करतात, परिसरात पसरवतात. मात्र यावर पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव आहे. यासह पालिकेच्या वाढीव क्षेत्रात अपवादानेच कचरा संकलन होत आहे. नागरिकांना घरासमोरच कचरा जाळून नष्ट करावा लागतो. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष आहे.
नगरपालिकेच्या आरोग्य खात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शहरातील कचरा उचलणार्या गाड्या अचानकपणे गायब होत असल्याने शहरांमध्ये कचरा साचत आहे. घरामध्ये लोकांनी कचरा सांभाळायचा कसा? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
नगरपालिकेचा कचर्याचा ठेका हा नेहमी वादाचा विषय आहे. ज्या ठेकेदाराला कचर्याचा ठेका दिला जातो. तो काही दिवसातच त्याला वैतागतो. शहराच्या अनेक भागात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा गाड्या दिसलेल्या नाहीत. पूर्वी दिवसाआड येणार्या गाड्या आता येत नाहीत. त्यामुळे घरामध्ये कचरा सांभाळून ठेवणे शक्य नसल्याने लोकांनी आता रस्त्याच्या कडेला कचरा फेकण्यास सुरुवात केली आहे. त्यातून आरोग्याचे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. पल्लवी एंटरप्राइजेस प्रा.ली या कंपनी ला कचरा व्यवस्थापन व संकलन करण्याचा ठेका देण्यात आलेला आहे मात्र मागील १२ महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फक्त देयके काढण्यात ते व्यस्त आहे. शहरांमध्ये कोणत्याही प्रकारचे सकारात्मक काम त्यांनी केले नाही त्यामुळे या कंपनीला ब्लॅकलिस्ट करून यांची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
0 Comments