Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासनास फसविणाऱ्या तोतयाविरूद्ध यवतमाळातही गुन्हा दाखल; जिल्हाधिकारी कार्यालयात थाटला सर्वोच्च न्यायालयाचा डेस्क


यवतमाळ : यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य माणूस काही काळ रेंगाळत दिसला तर त्याला वारंवार हटकले जाते. मात्र एका ठगाने सर्वोच्च न्यायालय समितीचा डेस्क तथा सर्वेक्षण अधिकारी असल्याचे भासवून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क् दोन महिने आपले कार्यालय चालविले. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेने या तोतया अधिकाऱ्याचे बिंग फुटले असले तरी येथील प्रशासकीय यंत्रणा किती बेजबादार आहे, याची प्रचिती या प्रकाराने आली आहे.

नागपूरसह यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातही या तोतया अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विजय रा. पटवर्धन उर्फ विजय राजेंद्र रणशिंग (३२, रा. नरसाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालय समितीचा डेक्स तथा सर्वेक्षण अधिकारी असल्याचे सांगून विजय पटवर्धन या नावाने त्याने जिल्हा प्रशासनाकडे २६ डिसेंबर २०२२ रोजी पत्र देवून प्रशासकीय इमारतीत कार्यालय सुरू करण्यासाठी जागा मागितली. मात्र कार्यालायासाठी वेळेत जागा न मिळाल्याने त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनीवर (क्र. ०७२३२-२४२४८८) फोन करून आपण सर्वोच्च न्यायालयातून बोलत असून सर्वोच्च न्यायालयाच्या डेस्कसाठी तातडीने जागा देण्याचे निर्देश दिले.जागा तातडीने न दिल्यास न्यायालयाचा अवमान केला म्हणून कारवाई करण्याची तंबी दिली. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही खातरजमा न करता या तोतयाच्या धमकीला घाबरून त्याला जागा उपलब्ध करून दिली. २ जानेवारीपासून त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीअंतर्गत नागपूर व औरंगाबाद खंडपीठासाठी काम करत असल्याची बतावणी करत कार्यालय सुरू केले. तुषार भवरे नामक व्यक्तीला स्वीय सहायक तथा लिपिक म्हणून नियुक्त केले. हा तोतया दोन महिला सहायक व एक सुरक्षा रक्षक घेवून परिसरात वावरत असल्याने कोणीही त्याच्यावर शंका घेतली नाही.

नागपूर येथील आदर्श विद्या मंदिरमध्ये ५ मार्च रोजी २० पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करून या परीक्षा केंद्राला सुरक्षा द्यावी अशी मागणी त्याने नागपुरातील कोतवाली पोलिसांकडे केली. या सुरक्षा व्यवस्थेच्या मागणी अर्जाबाबत पोलिसांना शंका आली. त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली. यात विजय पटवर्धन हा तोतया असल्याचे पुढे आले. नागपूर कोतवाली ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नवनाथ देवकते यांनी तपास सुरू केला. मिळालेच्या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांचे पथक सर्वप्रथम माहूर येथे पोहोचले. तेथे त्यांनी आरोपी विजय भाड्याने राहात असलेल्या घराची झडती घेतली. विजयने बनावट भरती प्रक्रियेच्या नावाने मोठी रक्कम जमा केल्याची शंका आहे. त्याने यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालय सुरू केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. सोमवारी रात्रीच नागपूरच्या कोतवाली पोलिसांनी यवतमाळ येथे धाड टाकून साहित्य जप्त केले व विजयला ताब्यात घेतले प्रशासकीय इमारतीत सर्वोच्च न्यायालय समितीच्या नावाने असलेले कार्यालय बोगस असल्याचे सांगताच जिल्हा प्रशासनालाही धक्का बसला. पोलिसांनी या कार्यालयातून विविध शिक्के, कागदपत्रे, लेटरपॅड जप्त केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशावरून जिल्हा नाझर यांनी या तोतयाविरूद्ध शहर पोलिसांत तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी तोतयाविरूद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments