वाशिम : राज्यात गुटखा बंदी झाली असली, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. मंगरूळपीर तालुक्यातही गुटख्याची अशा पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरीवर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे सर्रास विकली जात आहे. विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शहरात २५० हून अधिक छोट्या-मोठ्या पानटपऱ्या आहेत किराणा दुकान आहेत या टपऱ्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त टपऱ्यांमध्ये गुटाख्याची सर्रास विक्री होत आहे.
अनेक पानटपरीचालक गुटख्याची पाकिटे लपवून ठेवून विक्री करतात, तर काही पानटपरी चालक उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात. अनेक टपरीचालकांचे चौकांतील पोलिस तसेच गस्तीवरील पोलिसांशी साटेलोटे असल्याने बिनधास्तपने गुटखा विक्री व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे.धक्कादायक म्हणजे यातील काही पान टपऱ्यांवर गुटख्यासोबत देशी दारू देखील विकली जाते. काही ठिकाणी तर गांजा देखील विकला जातो.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. मध्य प्रदेशातून शहरात गुटखा दाखल होतो. गुटखा तस्करांकडून पानटपरीवर तो पोहोचतो व शहरात प्रत्येक पानटपरींवर विक्रेत्यांना गुटखा मिळत असतो. विद्यालय- महाविद्यालय, रुग्णालय, पोस्ट ऑफिस, अकोला चौक ,दर्गा चौक, मानोरा चौक, नासर्जन चौक परिसर, बस स्टॅन्ड परिसरां सह शासकीय कार्यालयांच्या 100 यार्ड परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक पानटपऱ्या,किराणा दुकानात गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन अथवा तहसील कार्यालय लगतच खुलेआम गुटखा विक्री होत असून मात्र अधिकारी वर्ग कार्यवाही करण्याऐवजी मूक गिळत बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी नोंदविले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला होता. पण तरीदेखील गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय. शाळेच्या परिसरात अनेक पान टपऱ्यांवर गुटखा सर्रास मिळत असल्याने विद्यार्थ्यांनाही तो खावासा वाटतो, परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. असं असल्यामुळे व्यसनमुक्ती फक्त कागदावरच का. एकीकडे तंबाखूमुक्त शाळा करण्याकामी प्रयत्न करत असताना दुसरीकडे सर्व गाव जर तंबाखू युक्त असेल तर व्यसन मुक्त अभियानाचा काहीही उपयोग होणार नाही. मंगरूळपीर असो का सेलू बाजार असो प्रशासनाने मोठी सावली उचलणे काळाची गरज आहे.
0 Comments