Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम शिवारात फुललाय ज्वारीच्या 25 हजार जननद्रव्यांचा खजिना


       वाशिम, 

 : आहारात वापरल्या जाणाऱ्या अन्नधान्यांमध्ये ‘पौष्टिक तृणधान्ये’ ही प्रमुख धान्य आहेत. पौष्टिक तृणधान्यांमध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी व नाचणी ही प्रमुख पौष्टिक तृणधान्ये असून त्यासोबतच इतर लघु पौष्टिक तृणधान्ये या गटात आहेत. ही पिके विपरीत हवामान परिस्थितीतही तग धरून उत्पादन देतात. त्यातील पौष्टिक पोषण मूल्यांमुळे त्याचे स्वास्थ आहारात विशेष स्थान आहे. येणारे दशक हे पर्यावरण बदलाचे असल्यामुळे अत्यंत तातडीने या पिकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. निकृष्ट मृदा, शेतीसाठी प्रतिकूल हवामानाची परिस्थिती इत्यादी बाबतीत हे पिके इतर पिकांपेक्षा उत्पादनाकरीता सरस ठरत आहेत. या पिकांची दुष्काळासाठी प्रतिरोधकता तसेच उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता तसेच निकृष्ट जमिनीत स्थिरावयाची क्षमता हे या पिकांचे अद्वितीय गुणधर्म आहेत. 

     

   

  कुपोषण, आहारातील महत्त्व, वातावरणातील हवामान बदलाच्या दृष्टीने या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रास प्रोत्साहन देणे, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मितीस प्रोत्साहन देऊन त्यांचा आधुनिक शेती तंत्राचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवणे व त्यामध्ये मूल्यवर्धन निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे तृणधान्य पिके हे कोरडवाहू शेतीचा कणा मानली जातात. या पौष्टिक तृणधान्याची पोषणमूल्ये आजवर दुर्लक्षित राहिले असल्यामुळे आज जगभरात आपणास ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ साजरी करण्याची वेळ आलेली आहे. 

         

केंद्र सरकारने यादृष्टीने यात पुढाकार घेऊन येत्या काळात पोषणयुक्त तृणधान्य कोठार असलेला देश बनवण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत.  याच पौष्टिक तृणधान्यांच्या पिकामध्ये ज्वारी हे अतिशय महत्त्वाचे पीक असून ज्वारी हे कमीत कमी निविष्ठांसह, वेगवेगळ्या परिस्थितीत व सर्व हंगामात घेता येणारे पीक आहे. सध्या परिस्थितीत तुरळक व कमी पर्जन्यमान असणाऱ्या तामिळनाडू ते अधिक पर्जन्यमान असणाऱ्या उत्तरांचलसारख्या राज्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारी हे पाण्याचा मोठा ताण सहन करणारे तसेच अवर्षण भागातील सुद्धा महत्त्वाचे पीक आहे.  कमी खर्चाचे, मोजक्या पाऊसमानात येणारे, दुबार पिकास उत्तम असे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी उत्तम ठरत आहे. अशा या ज्वारी पिकाचे भारतातील सर्व उपलब्ध जननद्रव्यांचा संग्रह राष्ट्रीय पादप आनुवांशीक संसाधन ब्यूरो (NBPGR), नवी दिल्ली यांच्या सहाय्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोलाचे वाशिम येथील कृषी संशोधन केंद्रात उपलब्ध होऊन त्याची लागवड वाशिम 

शिवारात करण्यात आलेली आहे. सध्या ही पीक वाणे कंसात दाणे भरणे ते दाणे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. 

     

    या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची मूळ संकल्पना कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व नियोजनबद्ध संकल्पनेतून साकार होत आहे. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात ती आकारास येत आहे. वरील सर्व जननद्रव्ये ही संख्येने फार मोठी असल्यामुळे 16 एकर शेतामध्ये पसरलेली असून या जननद्रव्यांची संवर्धित प्रणाली (Augmented design) मध्ये लागवड करण्यात आलेली आहे. यातील खूप जननद्रव्ये ही अतिशय दुर्मिळ स्वरूपाची आहेत. त्यासाठी एकंदरीत पूर्ण परिसरात 9 विभाग करण्यात आलेले आहे. त्यासोबतच ज्वारीचे सध्याचे 6 वैशिष्ट्यपूर्ण वाण हे नियंत्रक वाण म्हणून वापरण्यात आलेले आहेत.  कुठलेही पिकात एकाच वेळी इतक्या मोठ्या 

प्रमाणावर जननद्रव्ये चाचणीचा कार्यक्रम आपल्या देशात प्रथमच होत असल्यामुळे भारतातील हा आगळावेगळा प्रकल्प असून राष्ट्रीयस्तरावरील हा जननद्रव्ये तपासणीचा विक्रम सुद्धा आहे.

         या जननद्रव्याची वेगवेगळ्या अवस्थेतील 26 गुणवैशिष्ट्ये या प्रकल्पात तपासण्यात येणार असून आतापर्यंत त्यामधील वेगवेगळ्या पीक अवस्थेतील 9 गुणवैशिष्ट्ये तपासणी पूर्ण झालेले आहे. तसेच उर्वरित 17 गुणवैशिष्ट्ये हे पिकाच्या पुढील अवस्थेतील असून त्यांचे अवस्थेनुसार पुढील काळात तपासणी कार्य पूर्ण होईल. या जननद्रव्यांमध्ये गोड ज्वारी, एकेरी कापण्याची वैरण ज्वारी, दुहेरी कापण्याची वैरण ज्वारी, हुरडयाची ज्वारी, लाह्यांसाठीची ज्वारी, खरीपाची दुहेरी धान्य व कळब्यासाठीची ज्वारी तसेच रब्बीसाठी वापरल्या जाणाऱ्या ठोकळमोत्यासारखे दाणे असणारी ज्वारी व सोबतच वेगवेगळ्या रंगाची रंगीत ज्वारी जननद्रव्ये यामध्ये उपलब्ध आहेत. ज्वारी पिकांचा हा वैविध्यपूर्ण खजिना सध्या कृषी संशोधन केंद्र, वाशिमच्या शिवारात डौलाने उभा आहे. सर्व ज्वारी संशोधनातील ज्वारी पैदासकार तसेच ज्वारी रोगशास्त्रज्ञ व ज्वारी कीटकशास्त्रज्ञ या वाणांची तपासणी व त्याचा आपल्या ज्वारी सुधारणा कार्यक्रमात समावेश करणार आहे. त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे.  हे वाण मुळात वेगवेगळ्या देशातील तसेच संपूर्ण भारतातील असल्यामुळे या सगळ्या वाणांचा एकाच वेळी एकत्रित अभ्यास या प्रकल्पातून होत आहे. त्याचा उपयोग ज्वारी संशोधनाची दशा व दिशा बदलण्यासाठी होऊ शकतो.  वरील सर्व वाणांचा पैदास कार्यक्रमातील वेगवेगळ्या पैदास पद्धती वापरून व त्यांचा योग्य समन्वय ठेवून ज्वारीच्या अधिक उत्पादन, अधिक गुणवत्ता व वेगवेगळ्या ताणास अधिक प्रतिबंधक क्षमता असणाऱ्या वाणांची निर्मिती ही काळाची गरज असून त्या दृष्टीने याचा परिणामकारक 

उपयोग होऊ शकतो व त्यामुळे ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यास याचा निश्चितपणे फार मोठा फायदा होईल.

     

   

 या वाणांची पेरणी ही 8 नोव्हेंबर 2022 ला करण्यात आलेली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी ते काढण्यास उपयुक्त राहील असा अंदाज आहे. या ज्वारी जननद्रव्ये तपासणी कार्यक्रम राष्ट्रीय पादप आनुवांशीक संसाधन ब्युरो (NBPGR), नवी दिल्ली यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्यामध्ये भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला हे या प्रकल्पातील मुख्य भागीदार आहेत.  या प्रकल्पात डॉ. सुशील पांडे व डॉ. सुनील गोमासे शास्त्रज्ञ, राष्ट्रीय पादप आनुवांशीक संसाधन ब्युरो, नवी दिल्ली डॉ. आर. बी. घोराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला तसेच डॉ. भरत गीते व श्री. एस. पी. गुठे शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, वाशिम यांचा प्रामुख्याने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत मोलाचा वाटा आहे.

         या जननद्रव्याच्या पैदास कार्यक्रमातील पुढील विकासासाठी व उपयोगासाठी ज्वारी शेतीदिन हा येत्या 13 मार्च 2023 रोजी कृषी संशोधन केंद्र, वाशिम यांच्या शिवारात आयोजित केलेला असून देशातील संपूर्ण ज्वारी संशोधक या कार्यक्रमाद्वारे त्यांना आवश्यक ते जननद्रव्यांची निवड करू शकतील व त्याचा उपयोग त्यांच्या ज्वार सुधार कार्यक्रमात करू शकतील. सध्या महाराष्ट्रातील राहुरी, परभणी व अकोला या केंद्रांसोबतच राष्ट्रीयस्तरावर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू, हरियाणा, उत्तराखंड लुधियाना, पंजाब, सुरत, उदयपूर व राजस्थान या ज्वारी संशोधन केंद्राद्वारे ज्वारी संशोधनाचा कार्यक्रम राबविला जातो. सोबतच आंतरराष्ट्रीय अर्धशुस्क उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्था (ICRISAT), हैदराबाद तसेच भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद येथेही ज्वारी संशोधनाचे कार्य अविरत चालू आहे.

          सर्व शास्त्रज्ञ या ज्वारी शेती दिनासाठी हजेरी लावणार आहेत. सोबतच राज्यातील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी पाटील व डॉ. पं. दे. कृ. वि., चे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच राज्याचे कृषी सचिव श्री. एकनाथराव डवले तसेच कृषी आयुक्त श्री सुनील चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.  या कार्यक्रमाला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहानिर्देशक डॉ.  टी. आर. शर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून राष्ट्रीय पादप अनुवांशिक संसाधन ब्युरो, नवी दिल्लीचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र प्रतापसिंग, भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ.  तारा सत्यवती यांची देखील उपस्थिती राहणार आहेत.

समृद्ध पोषणमूल्ये व दुघ व्यवसायास बळकटी देणारा हा मोठ्या गुणांचा मुक्त खजिना :  कुलगुरू, डॉ. शरद गडाख आजच्या या वातावरणातील हवामान बदलाच्या काळात आपल्या प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीची पातळी स्थिरावली असून जवळपास सगळ्यात महत्त्वाच्या पिकांमध्ये अनुवंशिक पाया (जेनेटिक बेस) विस्तारण्याची गरज आहे. या काळात ज्वारीसारख्या पिकातील 25 हजार वैशिष्ट्यपूर्ण विविधता हा एक प्रकारे या पिकातील मोठ्या गुणांचा मुक्त खजिना असून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने ज्वारी पिकातील शास्त्रज्ञांसाठी मोठी पर्वणी आहे. या समृद्ध संपत्तीचा नियोजनबद्ध व योग्य उपयोग करून घेतल्यास महाराष्ट्रातील ज्वारी संशोधनास एक नाविन्यपूर्ण व आगळीवेगळी दिशा निश्चितपणे या प्रकल्पातून उपलब्ध होईल. हवामान बदलाच्या या काळात ज्वारी हे पीक आपणास समृद्ध पोषणमूल्ये तसेच आपल्या जनावरांसाठी वैरण देणारे व पर्यायाने दुग्ध व्यवसायास बळकटी देणारे असल्यामुळे सर्वांच्या जिव्हाळ्याचे हे पीक आहे. या प्रकल्पाद्वारे ज्वारी संशोधनासाठी आगळी-वेगळी दिशा मिळेल हा विश्वास आहे. २५ हजार जननद्रव्यांचा हा कृषी संशोधन केंद्रातील कार्यक्रम हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जननद्रव्यांच्या वर्णनाचा कार्यक्रम आहे. या प्रकल्पातील सर्व नोंदी ह्या डिजिटल रजिस्टरमध्ये घेण्यात येत आहे. कागद विरहित प्रकल्प ही सुद्धा या प्रकल्पाची मोठी यशस्विता आहे.

वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शक प्रकल्प : संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे ज्वारीच्या सदर २५ हजार जननद्रव्यामध्ये वैरण ज्वारी, गोड ज्वारी, हुरडा तसेच लाईनसाठीची ज्वारी अशा नानाविध बहुपर्यायी उपयोगासाठी वाण उपलब्ध असून कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शनात या प्रकल्पाचे अतिशय काटेकोरपणे नियोजन केलेले असून प्रकल्पाचा फार मोठा फायदा नजीकच्या काळात दिसल्याशिवाय राहणार नाही. या प्रकल्पामध्ये 9 तांत्रिक कर्मचारी हे मागील चार महिन्यापासून अहोरात्र परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमातील सर्व नोंदी ह्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. एकाच वेळी संपूर्ण जननद्रव्ये एकाच ठिकाणी उपलब्ध होणे ही सुद्धा खरोखरच फार मोठी उपलब्धी आहे. शास्त्रज्ञांना त्यांचा मुक्त वापर करण्याची ही एक नामी संधी या प्रकल्पाने उपलब्ध करून दिली आहे.

*******


Post a Comment

0 Comments