मंगरुळपीर (दि.४): दि.७ फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती 'मातृ दिवस' म्हणून घोषित करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आहे.
माता रमाबाई यांनी आपल्या जीवनात अपार त्याग व कष्ट केले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षणासाठी विदेशात असताना माता रमाबाईंनी आपल्या मुलांसाठी प्रचंड कष्ट घेऊन एक आदर्श माता कशी असावी? व एक आदर्श पत्नी कशी असावी? हे त्यांनी आपल्या जीवनात समस्त स्त्रियांना दाखवून दिले. फेब्रुवारी महिन्याच्या ७ तारखेपासून आपण इंग्रजी संस्कृतीचे अनुकरण भारतात मोठ्या प्रमाणात करतो. ७ तारखेपासून व्हॅलेंटाईन डे आठवडा सुरु होतो. दिनांक ७ फेब्रुवारीला 'रोज डे' ने या आठवड्याची सुरुवात होते. परंतु ७ फेब्रुवारीलाच माता रमाईची जयंती असते आणि या त्यागमूर्ती माताची महाराष्ट्रातील जनतेला मात्र आठवण येत नाही. खरंतर तरुण-तरुणींना इंग्रजी संस्कृतीशी जोडण्याचे काम देशातील काही तथाकथीत लोक करीत असून भारताचा सत्य इतिहास लपवण्याचे हे एक षडयंत्र आहे आणि याला आमचे सर्व तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी बळी पडत आहेत. माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीला पूर्ण महाराष्ट्रभर 'मातृ दिवस' म्हणून घोषित करण्यात यावे व हा दिवस 'मातृ दिवस' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, तालुका प्रवक्ता शिवाजी गजभार, तालुका उपाध्यक्ष योगेश ठाकरे, तालुका संपर्क प्रमुख हरीश गव्हाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments