६ कर्मचारी बडतर्फ तर ५२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
८३ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर
वाशिम खबर वृत्तसंकलन...
कारंजा एस टी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या ८३ दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात कारजा आगारातील २०२ कर्मचारी सहभागी असून आतापर्यंत ५२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर सहा जणांना बडतर्फ करण्यात आले.
आता कारजा आगारातील १९ एस टी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली असून आपल्यावर बडतर्फीची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटीसीतून करण्यात आली आहे. आतापर्यंत १५० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावून विहित मुदतीत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. कारंजा आगारातील एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून या संपात सहभागी झाले आहे. ७ नोव्हेंबर ते २९ जानेवारी असा ८३ दिवसांपासून हा संप सुरू असून या संपामुळे कारंजा आगाराचे प्रतिदिन ५ लाख या प्रमाणे ४ कोटी १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान संपातील दोन कर्मचारी कामावर रूजु झाल्याने मागील जवळपास दहा दिवसांपासून कारजा मुर्तीजापूर ही बस सुरू करण्यात आली. त्यानंतर दोन यांत्रिक देखील कामावर परतल्याने संपातून कामावर परतलेल्यांची संख्या चार झाली आहे. दरम्यान या संपामुळे प्रवाशांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून खासगी वाहनधारकांनी केलेल्या तिकिट दरवाढीचा फटका सुध्दा प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर न परतण्याचा निर्णय एस टी कर्मचाऱ्यांनी घेतल्यानें आणखी किती दिवस प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागेल असा सवाल प्रवाशातून विचारल्या जात आहे.
0 Comments