वाशीम : जीवनामध्ये लक्ष निर्धारीत करून निस्वार्थ भावनेने सेवा केला तर त्याचे फळ चांगलेच मिळत असते. राजकारणात राहून आपण पदापेक्षा मित्र परिवार व लोकांच्या, शिक्षकांच्या व जनतेच्या कामाला महत्व दिले त्यामुळे मला अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली. मी राजकारणात नसतांना वाशीम येथे डॉक्टर म्हणून रूग्णांची सेवा केलेले आहे. आजही वाशिमला अकोला जिल्हयाचाच भाग मी समजतो. माझ्या प्रत्येक यशात व वाटचालीत विकासात वाशीम जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री तथा पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केले.
स्थानिक केमिस्ट भवन येथे सोमवार 10 जानेवारी रोजी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ व केमिस्ट ड्रगिस्ट असो. वतीने आयोजित चर्चासत्रात त्यांनी वरील प्रतीपादन केले. मंचावर अ.भा. योग शिक्षक महासंघ व केमिस्ट ड्रगिस्ट असो. चे जिल्हाध्यक्ष राजेश सिरसाट पाटील, तरूण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, योगसंघटनेचे सचिव दत्तराव भिसडे, आनंद टांग, डॉ. माधव हिवाळे उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजेश पाटील सिरसाट व निलेश सोमाणी यांनी आपल्या विचारातून योग संघटनेच्या विविध मागण्या मांडल्या. सोबतच सिरसाट यांनी केमिस्ट बांधवांच्या ऑनलाईन समस्याही विषद केल्या. यावेळी सोमाणी यांनी पदवीधर मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. माजी गृहमंत्री रणजित पाटील व मान्यवरांच्या हस्ते तरूण समतावाणी व भारतीय जैन संघटनेच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. तदनंतर जिल्हाध्यक्ष सिरसाट व पदाधिकारी योग संघटनेच्या 11 मागण्याचे निवेदन डॉ. रणजित पाटील यांना दिले. यावेळी आ. पाटील यांनी योग हे शास्त्र असून याचा एमपीएससी अभ्यासक्रमात समावेश व्हावा, प्रत्येक शाळेत योग शिक्षक असावा यासोबत अन्य मागण्यांना शासन दरबारी रेटून त्या मान्य होईपर्यंत पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमात डॉ. पाटील यांचा नारी शक्ती संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष प्रा. संगीता इंंगोले, भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस रूपालीताई देशमुख, महिला शहराध्यक्ष अंजलीताई पाठक, सरचिटणीस छाया मडके, भावना सरनाईक यानी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेश सिरसाट, संचालन जगन्नाथ खिल्लारी यांनी तर आभार वाझुळकर सर यांनी मानले.
0 Comments