मुंबई: पाच दिवस वाढत्या रुग्णवाढीच्या दराच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत रुग्णवाढ काहीशी स्थिरावली आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यात ४१ हजार नवे करोनाचे रुग्ण आढळले, तर १३३ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
राज्यात २९ डिसेंबरपासून दैनंदिन रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणावर झाली होती. दररोज पाच ते दहा हजारांपर्यंत वाढीव रुग्णांची भर पडली होती. या तुलनेत गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रुग्णवाढ फार झालेली नाही. राज्यात ४१ हजार नवीन रुग्ण आढळले असले तरी गेल्या चार-पाच दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या लक्षात घेता, गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या काहीशी स्थिरावल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईलागोपाठ तिसऱ्या दिवशी २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई २०,१३८, ठाणे शहर ३०९२, नवी मुंबई २४३९, नाशिक जिल्हा १०६२, पुणे शहर २५२१, िपपरी-चिंचवड १०७५, नागपूर शहर ५७७ नवे रुग्ण आढळले.
राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार होती. यापैकी मुंबईत १ लाख, सहा हजार रुग्णांचा समावेश होता. ठाणे जिल्ह्यात ३०,०३९ तर पुणे जिल्ह्यात १५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. ओमायक्रॉनचा १३३ जणांना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी ११८ पुणे शहर, िपपरी-चिंचवड ८, पुणे ग्रामीण ३, वसई-विरार दोन, मुंबई आणि नगरच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले
मुंबई :मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या जसजशी वाढत आहे, तशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावेळी रुग्ण चार पाच दिवसातच बरे होत असल्यामुळे दिवसाला पाच हजार रुग्णांना दाखल करण्याची वेळ आली तरी पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या रुग्णांच्या संख्येनुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने खाटांचे नियोजन केले आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येने २० हजाराचा टप्पा पार केला आहे. मात्र रुग्ण वाढत असले तरी त्यापैकी ८० ते ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र एकूण रुग्णांच्या तुलनेत लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण गेल्या आठवडय़ाभरात वाढू लागले आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत ९० टक्के रुग्णांना लक्षणे नव्हती, आता हेच प्रमाण ८४ टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. सध्या दिवसाला दीड हजार रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते आहे. मात्र रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजारापर्यंत गेली तरी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments