Ticker

6/recent/ticker-posts

युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे : निलेश सोमाणी


वाशिम : युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे, भारत देशात युवा शक्ती मोठया प्रमाणात असल्याने विश्वगुरू बनण्याची ताकद देशात आहे.  युवा शब्दाला उलट वाचल्यास वायु होतो. युवकांनी वायु सारखे गतिशील असले पाहिजे, देशाने मला काय दिले ? हा प्रश्न सतत विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय केले ही भूमिका स्वीकारून देशाच्या विकासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांनी केले.  
युग पुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शासनाच्या वतीने युवकांचा सर्वागिण विकास करणे व राजकिय व सामाजिक कार्यात युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी 12 ते 19 जानेवारी पर्यंत युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ऑनलाईन पध्दतीने राष्ट्रीय पुरूषांचे तत्वज्ञान व शिकवण त्यावर व्याख्यान, वादविवाद, निबंध , चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम , सामुहगान कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशीमच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.  
   भारत सरकारचा युवा जगतातील सर्वोच्च राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त तरूण क्रांती मंच , भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांचे  14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्र उभारणीमध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका, सामाजिक उपक्रम व नियोजनामध्ये युवकांचा सहभाग या विषयावर ऑनलाईन व्याख्यान पार पडले. सर्वप्रथम जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात आयोजित व्याख्यानामध्ये जिल्हा समन्वयक राजेश गावंडे यांनी पुष्पगुच्छ देवून सोमाणी यांचे स्वागत केले.  तदनंतर जिल्हा क्रिडाधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी ऑनलाईनव्दारे सोमाणी यांचे स्वागत केले. यावेळी निलेश सोमाणी यांनी युवकांना विविध दाखल्यासह प्रबोधन केले. सोबतच युवकांनी गाव, शहर व देश विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन करीत युवकांनी जीवनात कधीही आत्महत्या करणार नाही.  आईवडीलांना वृध्दश्रमात पाठविणार नाही व देशप्रती कधीही गद्दारी करणार नाही अशी शपथ दिली. संपूर्ण विश्वामध्ये भारतालाच मातेचा दर्जा आहे.  भारताला भारतमाता म्हटल्या जाते. विश्वामध्ये कोणत्याही देशासमोर माता शब्द लावण्यात येत नाही.  भारतीय संस्कृती ही विश्वात पुज्यनिय आहे. युवकांनी पाश्चिमात्य सांस्कृतीच्या आहारी जावून नये, भारतीय संस्कृतीचे जतन करावे.  जिद्द, चिकाटी व परिश्रमाची कास धरावी असे आवाहन केले.   ऑनलाईन व्याख्यानामध्ये युवक, युवती मोठया संख्येत सहभागी झाले होते.   यानंतर चर्चासत्रात युवकांनी विचारलेल्या प्रश्नाचे सोमाणी यांनी उत्तर देवून समाधान केले.   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन राजेश गावंडे तर आभार जिल्हा क्रिडाधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी व्यक्त केले. 

Post a Comment

0 Comments