Ticker

6/recent/ticker-posts

गजानन महाराज संस्थानमध्ये शिवशंकरभाऊ पाटील यांना अभिवादन


वाशिम - श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे अर्ध्वयु, कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा १२ जानेवारी रोजी जन्म झाला होता. त्यानिमित्त त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम स्थानिक जुनी आयुडीपी कॉलनीतील श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये घेण्यात आला.
    या कार्यक्रमाला संस्थानचे अध्यक्ष दयाराम राऊत, जेष्ठ समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे, संस्थानचे विश्वस्त हभप श्रीकृृष्ण पाटील राऊत, काशिनाथ कोळी, गजानन जोशी, अभिजित पवार, दिनेश भालेराव, ऋतुराज व्यवहारे, निवृत्ती हेंबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन केले. नंतर सर्वानी त्यांना अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कार्याचा उजाळा आपल्या मनोगतातून केला. लॉ. वसंतराव धाडवे म्हणाले की, शिवशंकरभाऊ पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संतनगरी शेगावचे नाव जगभरात पोहचविले. वारकर्‍यांसाठी ते आध्यात्मिक सेवेचे दीपस्तंभ होते. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने शेगाव संस्थानला शिस्त व सेवा दिली. त्यामुळे शेगाव येथे येणारे भविक भक्त त्यांच्या कार्याचे कौतुक करीत होते. संस्थेमध्ये त्यांनी अध्यात्मीक, शैक्षणिक, सामाजीक उपक्रमासह रुग्णाला सेवा देणारे अनेक उपक्रम राबविले. ते आजतागायत सुरळीत सुरु आहेत. त्यांच्या अजोड कार्यामुळे शेगाव संस्थान प्रती पंढरपुर म्हणून जगभरात मान्यता पावले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेवून रंजल्यागांजल्यांची सेवा करावी. आयुडीपी येथील श्रीं चे संस्थान सुध्दा त्यांच्या कार्याचा आदर्श घेवूनच सुरु असल्याचे धाडवे यांनी नमूद केले.
    हभप श्रीकृष्ण पाटील म्हणाले की, कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील सारखा निस्सीम श्रीभक्त हजारो लाखो वर्षात एकदाच जन्मतो. कोरोनाकाळात त्यांनी संस्थानचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करुन हजारो रुग्णांचा जिव वाचविला आहे. त्यांनी ‘श्रीं’च्या विचारांना अनुसरून मानवतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यांनी केलेल्या अतोनात परिश्रमामुळे शेगाव संस्थानची ख्याती व गजानन महाराजांची भक्ती संपुर्ण जगभरात पसरली असून देशविदेशातील भाविक भक्त श्रीं च्या दर्शनाला शेगाव येथे येतात. या अभिवादन कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments