Ticker

6/recent/ticker-posts

अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; राणांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

अमरावतीः शहरातील नवनिर्मित राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने १२ जानेवारीच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, हा पुतळा बसविण्यासाठी कुठल्याच प्रकारची परवानगी न घेण्यात आल्याने अखेर शनिवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आला आहे. दरम्यान, आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १२ जानेवारी मध्यरात्री आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून नवनिर्मित राजापेठ उड्डाणपूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. यासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या पूर्वपरवानगी न घेण्यात आल्यामुळे पुतळा सन्मानपूर्वक हलविण्यात यावा यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. या संदर्भात आमदार रवी राणा यांनी महानगरपालिकेत बैठक घेऊन या पुतळ्याला सर्व परवानग्या तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली होती इथून पुतळा हलविल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा सुद्धा आमदार रवी राणा यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री प्रचंड पोलिस जमावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राणा दाम्पत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्यांच्या निवासस्थानी प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments