Ticker

6/recent/ticker-posts

सरकारी यंत्रणांवर ताण ; डॉक्टर, पोलिसांसह शासकीय कर्मचारी मोठय़ा प्रमाणात बाधित

राज्य पोलीस दलातील हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.
मुंबई : ओमायक्रॉनमुळे राज्यातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना साथ आटोक्यात आणण्यासाठी झटणारे आरोग्य कर्मचारी, कायदा- सुव्यवस्था राखणारे पोलीस दल, शासकीय कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्यसेवेसह सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत राखण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. 

राज्यातील चारशेहून अधिक डॉक्टर बाधित आहेत, तर राज्य पोलीस दलातील हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. रेल्वे, शासकीय कार्यालयांमध्येही अशीच स्थिती आहे. राज्यात दररोज ४० हजारांहून अधिक नागरिक बाधित होत आहेत, तर मुंबईत सुमारे २० हजार रुग्णांची भर पडत आहे. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असले तरी प्रतिदिन मुंबईत सुमारे दीड हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे मुळातच आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढलेला असताना डॉक्टरांसह इतर कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर बाधित झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंधही कठोर करण्यात आले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही मोठय़ा प्रमाणावर करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे नियोजन आणि त्याच वेळी कार्यरत मनुष्यबळाची कमतरता अशी तारेवरची कसरत सुरू आहे.

चारशेहून अधिक निवासी डॉक्टर बाधित

राज्यात आतापर्यंत ४१२ निवासी डॉक्टर बाधित झाले आहेत. त्यात केईएम, लोकमान्य टिळक आणि जे.जे. रुग्णालयातील तीनशेहून अधिक निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. त्याचबरोबर कूपर, ठाणे, पुणे, सोलापूर येथेही निवासी डॉक्टर बाधित झाले आहेत. याशिवाय परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचारीही मोठय़ा प्रमाणात बाधित झाले आहेत. निवासी डॉक्टरांचे मनुष्यबळ आधीच कमी आहे. त्यात आता विभागात अनेकजण बाधित होत असल्यामुळे कामकाजाचा ताण उरलेल्या डॉक्टरांवर येत आहे. करोनाबाधितांची संख्या तुलनेने कमी असली तरी अन्य वैद्यकीय सेवा सुरू आहेत. त्यामुळे कामाचा ताण कमी झाला असे म्हणता येणार नाही. मनुष्यबळाचा तुटवडा येत्या काळात आणखी काही प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे, असे केईएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनुष्यबळाचा तुटवडा असला तरी उपलब्ध मनुष्यबळामध्ये वैद्यकीय सेवा सुरू आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या करोनाबाधितांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असल्यामुळे कमी मनुष्यबळात सर्व सेवा देणे शक्य होत आहे. पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षांचे विद्यार्थी रुजू होईपर्यत एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना रुजू करून घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढण्याची शक्यता आहे, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

इतर आरोग्यसेवांवर परिणाम

‘रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात दरदिवशी काही कर्मचारी बाधित होत असल्यामुळे मनुष्यबळ कमी पडत आहे. परिणामी उर्वरित कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. औषधशास्त्र विभागामध्ये डॉक्टर अधिक प्रमाणात बाधित झाल्यामुळे येथील एका डॉक्टरला आता तीन कक्ष सांभाळावे लागत आहेत. त्यात इतर कर्मचारीही बाधित झाल्यामुळे त्यांचेही मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे आता इतर आजारांच्या सेवा कमी करणे किंवा शस्त्रक्रिया पुढे ढकलणे भाग पडत आहे,’ असे लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयातही हीच स्थिती आहे. त्यामुळे आता हळूहळू करोनाव्यतिरिक्त सेवांवर याचा परिणाम होत आहे.

एक हजाराहून अधिक पोलीस बाधित

राज्य पोलीस दलात गेल्या २४ तासांमध्ये २६२ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २९ पोलिसांना दुसऱ्यांदा करोनाची बाधा झाली आहे तर गेल्या २४ तासांत राज्य पोलीस दलात सापडलेल्या २६२ करोना रुग्णांपैकी १७३ जणांना दोन्हीमात्रा घेतल्या होत्या. गेल्या २४ तासांत अहमदनगर येथे एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्य पोलीस दलात सध्या आठ हजार ९६८ पोलीस विलगीकरणात असून १०४६ सक्रिय करोना रुग्ण आहेत. त्यामुळे करोनाग्रस्त पोलिसांचा आकडा ४७ हजार ३७८ वर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनाकाळात नागरीकांची सुरक्षा करणाऱ्या ५०१ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मंत्रालयातील ८० अधिकारी बाधित

विधान भवनापाठोपाठ आता मंत्रालयातही करोनाचा शिरकाव झाला आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयांसह मंत्रालयात सहसचिव-उपसचिवांसह विविध विभागांतील सुमारे ८० हून अधिक कर्मचारी बाधित झाले आहेत. परिणामी मंत्रालयातील काही विभागांत प्रवेशावर बंधने घालण्यात आली आहेत.

पश्चिम रेल्वे, बेस्ट कर्मचारीही बाधित

राज्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही बाधित कर्मचाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढते आहे. गेल्या चार दिवसांत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील पाचशेहून अधिक कर्मचारी बाधित झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महापालिका, बेस्टमध्येही बाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.

संसदेतील ४०० कर्मचाऱ्यांना लागण

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपले असताना संसदेतील ४०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आह़े. राज्यसभा सचिवालयातील ६५ आणि लोकसभा सचिवालयातील २०० आणि संसदेतील विविध सेवांशी संबंधित १३३ कर्मचारी ४ ते ८ जानेवारीदरम्यान करोनाबाधित झाल़े.

चार न्यायमूर्तीना संसर्ग

सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तीना करोनाचा संसर्ग झाला आह़े, तसेच न्यायालयातील १५० कर्मचारी संसर्गामुळे किंवा रुग्णसंपर्कामुळे विलगीकरणात असल्याचे समजत़े.

करोनाप्रसार..

’राज्यात एक हजाराहून

अधिक पोलीस बाधित,

६५ अधिकाऱ्यांचा समावेश

’मुंबईत उपायुक्त आणि त्याहून वरिष्ठ पदावर असलेल्या १८ पोलीस अधिकाऱ्यांना करोना़ 

’मंत्रालयाच्या विविध विभागांतील ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांना संसर्ग

’मुंबईत पश्चिम रेल्वेच्या ५०० कर्मचाऱ्यांना लागण, एसटी, बेस्टमध्येही बाधितांचे वाढते प्रमाण

’संसदेतील ४०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागण

पंतप्रधानांकडून आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला़ प्रतिबंधित क्षेत्रांबाबतची काटेकोर अंमलबजावणी, वेगवान लसीकरण, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्याची सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत केली़ मोठय़ा प्रमाणात रुग्णवाढ होणाऱ्या राज्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली़ या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, कॅबिनेट सचिव, गृहसचिव, हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सहभागी झाले होत़े

Post a Comment

0 Comments